बाळासाहेब ठाकरेंची सून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करणार?; "संधी मिळाली तर..."

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 09:59 AM2024-02-23T09:59:45+5:302024-02-23T10:00:33+5:30

बाळासाहेब ठाकरे आणि स्मिता ठाकरेंचे नाते कसं होतं? स्मिता ठाकरेंना राज्यसभेवर जाण्यापासून कुणी रोखलं?

Balasaheb Thackeray's daughter-in-law Smita Thackeray praised Narendra Modi | बाळासाहेब ठाकरेंची सून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करणार?; "संधी मिळाली तर..."

बाळासाहेब ठाकरेंची सून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करणार?; "संधी मिळाली तर..."

मुंबई - बाळासाहेबांनी मला महाराष्ट्राच्या राजकारणात येऊ नको असं सांगितले होते. इथं खूप खिचडी आहे असं त्यांनी म्हटलं. त्यापेक्षा तू राज्यसभेवर जावं असं ते म्हणाले होते. ही बाळासाहेबांची इच्छा होती. मी कधीही मागणी केली नाही. माझ्यात क्षमता आहे हे पाहून मला त्यांनी आश्वासन दिले, ३ वर्ष ते शब्द देत होते. परंतु ते पूर्ण होऊ शकले नाही. आता यामागे कोण होते, काय कारण आहे हे मला माहिती नाही. तसेच माहिती असले तरी बोलून फायदा नाही. आता हे घडून गेले आहे. मी राजकारणात येऊ नये हे कुणाला वाटत होते हे सगळ्यांना माहिती आहे. समजणाऱ्यांना इशारा काफी है असं विधान स्मिता ठाकरेंनी केले असून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असं त्यांनी म्हटलं. 

स्मिता ठाकरे म्हणाल्या की, माझे विचार जुळत असतील आणि परिस्थिती तशी होत असेल तर राजकारणात येण्याचा विचार करू. मी जे काही आहे स्पष्ट बोलते. मला बाळासाहेब ठाकरे प्रेरित करत होते, आता नरेंद्र मोदी प्रेरित करतात. जर त्यांच्या नेतृत्वात मला काही करण्याची संधी मिळाली तर मी जरूर करेन. मी नरेंद्र मोदींच्या कामाने खूप प्रेरित आहे. गेल्या ९ वर्षात मोदींनी देशाला पुढे नेले आहे. आज सनातन धर्म जगात मानला जातो. यूएईमध्येही सनातन धर्माला मानायला लागलेत. आज मोदी पुढे जातायेत त्यांच्यामागे सगळे चाललेत. आजपर्यंत कोणत्या पंतप्रधानाला असं पाहिलंय का? मी आज ते पंतप्रधान आहेत म्हणून बोलत नाही तर अनेकदा साहेबांना भेटायला आमच्या घरी मोदी यायचे तेव्हा सामान्य कार्यकर्ते  म्हणून मी पाहिले आहे. त्यांची कार्यशैली, कामाची पद्धत त्यांनी कधी स्वत:साठी पैसा जमा केला नाही. मी मोदींच्या सिद्धांतावर चालणारी आहे. मी जसे समाजकारण केले तसे राजकारण करण्याची इच्छा आहे असं त्यांनी सांगितले. 

..तर दसरा मेळाव्याला का जाऊ नये?

प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. रक्ताचा वारसदारच खरा वारसदार आहे, कुणी म्हणतं विचारधारा पुढे घेऊन जाणारा वारसदार असतो, प्रत्येकाची वेगळी मते असतात. मी यावर काही बोलणार नाही. परंतु खुर्चीवर बसणाऱ्याने जनतेसाठी काम करायला हवे हे मला वाटते. एकनाथ शिंदे यांच्याकडून मला दसरा मेळाव्याचे आमंत्रण आले. त्यामुळे मी तिथे गेले. मला व्यासपीठावर बोलावलं जाईल वाटलं नव्हते. साहेब असताना आम्ही दसरा मेळाव्यात व्यासपीठावर खाली बसून ऐकायचो. त्यानंतर कालांतराने आम्हाला बाजूला केले. दसरा मेळाव्याचा भाग बनवलं जात नव्हते. त्यात इतक्या वर्षानंतर दसरा मेळाव्याला कुणी आमंत्रण देत असेल तर मी का जाऊ नये? असा सवाल स्मिता ठाकरेंनी केला. 

बाळासाहेब राजकारणी नव्हते

शरद पवार हे राजकारणी होते, बाळासाहेब ठाकरे हे राजकारणी नव्हते. हा दोन व्यक्तिमत्वामधील फरक होता. ते दोघे मित्र होते. बाळासाहेब मैत्री जपायचे. त्यांची भूमिका टोकाची असली तरी त्यांचे बरेच मित्र सत्तेत आणि विरोधात होते. मैत्रीसाठी काहीपण करू शकायचे. राजकारण हे वेगळे होते. राजकारणात ते ठाम भूमिका घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व करारी होते. ते भाषण करायचे नाही तर लोकांशी संवाद साधायचे. एकदा जे बोलले त्यातून मागे हटायचे नाहीत म्हणून ते लोकांच्या हृदयात होते असं स्मिता ठाकरेंनी म्हटलं. 

बाळासाहेबांचे नातवांवर आणि पत्नीवर खूप प्रेम होतं

बाळासाहेब नातवांना खूप प्रेम करायचे. बाजारात कुठलीही नवीन गोष्ट आली तरी ते खरेदी करून घरी आणायचे. लहानपणी मी बाटलीसोबत खेळायचो. मला खेळणी मिळाली नाहीत त्यामुळे मी माझ्या नातवांना खेळणी देतोय असं ते म्हणायचे. मला जेवढे होतंय ते मी त्यांच्यासाठी करेन. बाळासाहेबांनी कधी लालसीपणा केला नाही. दिलदारपणे सर्वांना मागेल ते द्यायचे. बाळासाहेब त्यांच्या पत्नी माँसाहेबांवर खूप प्रेम करायचे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांचा फोटो खिशात असायचा. प्रेम काय असते हे आम्ही जवळून पाहिलंय. बाळासाहेब माँसाहेबांची खूप आठवण काढायचे अशी आठवण स्मिता ठाकरेंनी सांगितली. 

दरम्यान, मी राजकारणात कधी नव्हते, मला आजपर्यंत शिवसेनेत प्रवेश मिळाला नाही. बाळासाहेबांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. माझे समाजसेवेचे काम सुरू होते. मला आणखी जबाबदारी हवी होती. त्यांनी मला फाऊंडेशन काढून दिले. बाळासाहेब नेहमी डायरी लिहायचे. दरदिवशी आमची चर्चा व्हायची. पण कधीही आम्ही राजकारणावर बोलत नसायचो. बाळासाहेबांचे सिद्धांत असायचे. बाळासाहेबांच्या निर्णयावर कुणीही संशय घेणार नाही. मी काहीही चुकीचे काम केले नाही. त्यामुळे मला घरातून बाहेर काढायचा प्रश्नच नव्हता. जर एखाद्याला आपली चूक लक्षात येत नसेल तर त्याला कुणीही काहीही म्हटलं तरी बदलू शकत नाही. अनेक संकुचित विचारांच्या अशिक्षित लोकांनी कहाण्या बनवल्या असं सांगत स्मिता ठाकरेंनी कौटुंबिक वादावर परखड मत मांडले. 
 

Web Title: Balasaheb Thackeray's daughter-in-law Smita Thackeray praised Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.