"...तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल"; तलाठी भरतीवरुन थोरातांचा विखे पाटलांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 03:47 PM2024-08-04T15:47:11+5:302024-08-04T15:48:04+5:30

तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल असं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं होतं.

Balasaheb Thorat criticizes Radhakrishna Vikhe Patli alleging malpractice in Talathi recruitment exam | "...तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल"; तलाठी भरतीवरुन थोरातांचा विखे पाटलांना इशारा

"...तर तुमचा पारदर्शक कारभार उघडा पडेल"; तलाठी भरतीवरुन थोरातांचा विखे पाटलांना इशारा

Balasaheb Thorat on Radhakrishna vikhe patil : राज्यातल्या तलाठी भरती परीक्षेदरम्यान गैरप्रकार झाल्याचा आरोप झाल्यानंतर  काही महिन्यांपूर्वी खळबळ उडाली होती. मात्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तलाठी भरतीमध्ये कोणताही गैरप्रकार झाला नसल्याचे म्हटलं आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी नवनिर्वाचित तलाठ्यांना नियुक्तीपत्र देऊन परीक्षा पारदर्शकपणे झाल्याचे म्हटलं आहे. या गैरव्यवहारावरुन आमदार रोहित पवार आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर सातत्याने टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल असं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं होतं. आता याप्रकरणी बाळासाहेब थोरात यांनी भाष्य केलं आहे.

आमदार रोहित पवार यांनी तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकाराचा मुद्दा लावून धरला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही या प्रकरणावरुन विखे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शासनाने परीक्षांचा निकाल अंतिम ठरवत मेरीट लिस्टमधील उमेदवारांना नियुक्तीपत्र दिले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना प्रत्युत्तर दिलं. 

" जिल्ह्यातील दोन महाभागांनी याबाबत आरोप केले होते. मात्र, तलाठी भरती ही पारदर्शक पद्धतीने झाली असून आज आम्ही नवनियुक्त तलाठ्यांना नियुक्त पत्र देत आहोत. ही या दोन महाभागांना चपराक आहे, या तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचे थोरातांनी सिद्ध करावं, त्यांनी भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध केलं तर मी राजकारणातून बाजूला जाईल आणि थोरात भ्रष्टाचार सिद्ध करू शकले नाही तर त्यांनी बाहेर जावं," असं विखे पाटील यांनी म्हटलं. 

विखे पाटलांच्या या टीकेला आमदार बाळासाहेब थोरात यांनी एक्स अकाऊंटवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. "महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही राजकारणातून संन्यास घ्या,असे मी म्हणणार नाही. मात्र सत्य लपवले तरी बदलणार नाही. तलाठी भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराचा गोपनीय अहवाल आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या जिल्हाधिकारी महोदयांनी राज्याच्या अपर मुख्य सचिवांना याच वर्षी फेब्रुवारीत पाठविला आहे. आपण त्यावर काय कार्यवाही केली, हे सुद्धा जनतेला आणि विद्यार्थ्यांना सांगावे. या शिवाय तलाठी भरतीमध्ये झालेल्या गैरप्रकारांचे अजूनही ढीगभर प्रकरणे आहेत, जी समोर आणली तर तुमचा 'पारदर्शक कारभार' उघडा पडेल," असा इशारा बाळासाहेब थोरात यांनी दिला.

"बाकी प्रश्न राहिला रेटकार्डचा, तर महसूल मधील अधिकाऱ्यांनी आपल्या दोघांचाही कार्यकाळ बघितला आहे, सत्य काय ते सगळ्यांना माहित आहे. तुमचे म्हणजे, ‘सौ चूहे खा के बिल्ली चली हज को...’ असे झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी तुम्हाला अहवाल पाठवला आहे, पाहिजे असल्यास मी ही पाठवतो," असेही बाळासाहेब थोरात म्हणाले.
 

Web Title: Balasaheb Thorat criticizes Radhakrishna Vikhe Patli alleging malpractice in Talathi recruitment exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.