भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष' पालकमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 11:01 AM2020-01-09T11:01:53+5:302020-01-09T11:02:20+5:30
मुख्यमंत्री यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे.
मुंबई: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. तर काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षाच्या जिल्ह्यात 'काँग्रेस प्रदेशाध्यक्ष' पालकमंत्री असणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री यांनी राज्यातील 36 जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची नियुक्ती केली आहे. तर ठाकरे सरकारमधील 36 मंत्र्यांचा हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे 43 मंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील 7 मंत्र्यांना पालकमंत्री पदापासून वंचित रहावे लागले आहे.
या यादीत राष्ट्रवादीला 12, शिवसेनेला 13 आणि काँग्रेसला 11 जिल्ह्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत. यात भाजप नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या जिल्ह्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांना अहमदनगरचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहेत.
पालकमंत्रीपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांचा नकार
कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे पत्र देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रात्री उशिरा बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते.