पालकमंत्रीपद स्वीकारण्यास बाळासाहेब थोरात यांचा नकार, आज घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 05:22 AM2020-01-09T05:22:17+5:302020-01-09T05:22:46+5:30
कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नकार दिला आहे.
समीर देशपांडे
कोल्हापूर : कोल्हापूरचे पालकमंत्रीपद स्वीकारण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट नकार दिला आहे. याबाबत गुरूवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन पालकमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे पत्र देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी बुधवारी संध्याकाळी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यामध्ये कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे अहमदनगरचे तर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रात्री उशिरा बाळासाहेब थोरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी कोणत्याही जिल्ह्याचे पालकमंत्रीपद घेणार नाही असे आधीच स्पष्ट केले होते. आमच्या कांग्रेसच्या सर्व मंत्र्यांपैकी एकाला कुणाला तरी पालकमंत्रीपद मिळणार नाही. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना संधी देणे मला आवश्यक वाटते. परंतु मुख्यमंत्री ठाकरे यांनी कसे काय माझे नाव जाहीर केले याचे आश्चर्य वाटते.
कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्यात रस्सीखेच आहे. मुश्रीफ हे पाटील यांना ज्येष्ठ आहेत तर कोल्हापूर जिल्ह्यात १० पैकी ४ कांग्रेसचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे सतेज पाटील यांचा या पदावर दावा आहे. या स्पर्धेतूनच थोरात यांना पालकमंत्रीपद दिल्याची चर्चा आहे.