सरकार तरी कितीवेळा कर्जमाफी करणार: बाळासाहेब थोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 11:14 AM2020-01-13T11:14:48+5:302020-01-13T11:16:43+5:30
दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकयांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांची कर्जमाफी केली आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. संगमनेर येथील मालपाणी लॉन्समध्ये जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने प्रगतशील शेतकरी व आदर्श गोपालक पुरस्कार शनिवारी प्रदान करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात थोरात बोलत होते.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले की, अजून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकयांचाही प्रश्न सुटणार आहे. त्याचबरोबर जे शेतकरी नियमित कर्ज भरीत आहेत. त्यांचाही विचार करण्यात येणार आहे. मात्र सरकार तरी किती वेळा कर्जमाफी करणार. यामध्ये शाश्वत उपाय शोधणे गरजेचे आहे.
त्यामुळे यावर राज्य सरकार काम करणार असून पुढच्या काळात हे काम करण्यात येईल असेही थोरात म्हणाले. तर आम्ही केलेल्या कर्जमाफीसाठी एकाही शेतकऱ्याला रांगेत किंवा फॉर्म भरण्याची गरज नाही. तसेच दोन लाखांच्यावर कर्ज असलेल्या शेतकयांचाही प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.