विखेंच्या विरोधात थोरातांचे मेहुणे उतरणार रिंगणात ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 11:05 AM2019-09-30T11:05:55+5:302019-09-30T11:42:07+5:30
शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
मुंबई - भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या शिर्डी मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहेत. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघात हस्तक्षेप करत बांधणी सुरु केली आहे. मात्र असे असले तरीही विखेंच्या विरोधात कोण अशी चर्चा असताना आता थोरातांचे मेहुणे आमदार सुधीर तांबे यांना ऐनवेळी विखेंच्या विरोधात उमेदवारी दिली जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांनतर त्यांना मंत्रीपद सुद्धा मिळाले. त्यातच सुजय विखे लोकसभा निवडणुकीत भाजपकडून निवडून आल्यामुळे विखे कुटंबाची जिल्ह्यात राजकीय ताकद अधिक वाढली आहे.त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
विखे यांच्या विरोधात सद्यातरी काँग्रेसकडे सक्षम असा उमेदवार नाही. तर काँग्रेस युवाचे प्रदेशाध्यक्ष व थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे यांना विखेंच्या विरोधात उमेदवारी देण्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु आहेत. मात्र आता ऐनवेळी बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे व सत्यजित तांबे यांचे वडील सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे थोरात आणि विखे कुटंब यांच्यात शिर्डीत जोरदार लढत होणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
सुधीर तांबेंचा राजकीय प्रवास
सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसकडून विद्यमान आमदार आहेत. भाजपच्या ताब्यातून तांबे यांनी हा मतदारसंघ ताब्यात घेतला होता. सन २००९ मध्ये प्रतापदादा सोनवणे लोकसभेत गेल्यानंतर नाशिकच्या रिक्त जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत तांबे यांनी विजयश्री संपादित केली होती. अवघ्या ११ महिन्यांच्या काळात त्यांनी केलेल्या कामांमुळे आणि मतदारांशी ठेवलेल्या थेट संपर्कामुळे त्यांना २०१० मध्ये ३४,३९० मतांच्या फरकाने विजय मिळाला होता. तर २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी ४२ हजार ८२५ मते प्रतिस्पर्धीपेक्षा अधिक मिळवत विजयाची हॅटट्रिक साधली होती.