Maharashtra Politics: “आम्ही सदैव मिलिंद नार्वेकरांच्या पाठीशी उभे राहू, शिंदे गटात येत असतील तर स्वागतच करू”
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 08:43 AM2022-10-31T08:43:49+5:302022-10-31T08:44:36+5:30
Maharashtra News: मिलिंद नार्वेकरांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे शिंदे गटातील मंत्र्यांनी म्हटले आहे.
Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. केवळ शिवसेना नाही, तर काँग्रेस, राष्ट्रवादीमधीलही नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात प्रवेश करताना दिसत आहेत. पक्ष संघटना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बैठका, दौरे यांवर भर देत आहेत. यातच मातोश्रीचे निष्ठावंत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरेंचे एकदम खास मानले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यातच शिंदे गटाच्या मंत्र्यांनी एक सूचक विधान केले आहे.
महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला. मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत मात्र वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, तर्क-वितर्क लढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी एक महत्त्वाचे विधान केले आहे.
मिलिंद नार्वेकर शिंदे गटात येत असतील तर स्वागतच करू
प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले की, मिलिंद नार्वेकर यांच्या जीवावर जर कोणी उठले असेल किंवा कोणी वाईटावर असेल तर आम्ही सदैव मिलिंद नार्वेकर यांच्या पाठीशी उभे राहू. नार्वेकर यांना हवी ती सर्व मदत करायला आम्ही तयार आहोत. जर मिलिंद नार्वेकर शिंदे गटामध्ये येत असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. तसेच मिलिंद नार्वेकर हे एमसीएमध्ये सर्वाधिक मतांनी निवडून आले आहेत. त्यांचे मेरिट आणि क्रेडिट आहे, त्यांचे कौतुक केले पाहिजे. नार्वेकर यांच्यासारखी व्यक्ती जर मला सापडली असती तर मी रोज सकाळी-संध्याकाळी त्यांचे कौतुक केले असते. पण नार्वेकर यांचं कौतुक केल्यामुळे काही लोकांना भीती वाटते, असा खोचक टोला उदय सामंत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यात मोठा वाटा
मिलिंद नार्वेकर एक व्यक्ती म्हणून लोकप्रिय आहेत. मिलिंद नार्वेकरांना आमची गरज भासली तर नक्कीच आम्ही सर्वजण नार्वेकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. एक व्यक्ती म्हणून नार्वेकरांचे राजकारणापलीकडे सर्वांशी चांगले संबंध आहेत. राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलो त्यावेळी त्यांनीच माझी भेट उद्धव ठाकरे यांच्याशी करून दिली होती. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द घडवण्यातही मिलिंद नार्वेकर यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे नार्वेकर यांचे शिंदे गटासोबतच नव्हे तर सर्वच राजकीय पक्षांसोबत चांगले संबंध आहेत, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"