Maharashtra Politics: “प्रत्येक सभेसाठी सुषमा अंधारेंना किती पेट्या मिळतात?”; शिंदे गटातील आमदाराचा रोकडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 03:38 PM2022-11-05T15:38:22+5:302022-11-05T15:39:33+5:30
Maharashtra News: कालपर्यंत हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांना साक्षात्कार कसा झाला, अशी विचारणा शिंदे गटाने केली आहे.
Maharashtra Politics: पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते विविध यात्रा, सभा, दौरे करताना पाहायला मिळत आहेत.राज्यभरातून शिंदे गटाला प्रचंड पाठिंबा मिळत असताना, एकीकडे आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा आणि शिवसंवाद यात्रा काढत असून, दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यावरून ठाकरे आणि शिंदे गटातील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना दिसत आहेत. यातच शिंदे गटातील एका आमदाराने सुषमा अंधारे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेसाठी किती पेट्या मिळतात, अशी रोखठोक विचारणा करण्यात आली आहे.
पक्ष वाढवण्यासाठी आम्ही लाठ्याकाठ्या खाल्ल्या. आमच्यासाठी कोणी मुंबईहून आला नव्हता. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून पक्ष वाढवला. सुषमा अंधारे यांच्यामुळे नीलम गोऱ्हे यांना बॅकफूटवर टाकण्याचा प्रयत्न आहे. तीन महिन्यांपूर्वी पक्षात आलेली सुषमा अंधारे प्रत्येक स्टेजवर जाऊन कशा प्रकारे वक्तव्य करत आहे. नीलम गोऱ्हे पक्षात आहेत हे लक्षात असू द्या, असा टोला शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
सुषमा अंधारे स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत
सुषमा अंधारे या स्वस्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही श्रीराम प्रभूला मानतो. कालपर्यंत हिंदू देव देवता आणि हिंदू धर्माविरोधात बोलणाऱ्या सुषमा अंधारे यांना साक्षात्कार कसा झाला? सुषमा अंधारे यांना प्रत्येक सभेच्या किती पेट्या मिळतात? याची महाराष्ट्रभर चर्चा आहे. सभेसाठी पेट्या घ्यायच्या आणि सभा करायच्या अशी चर्चा राज्यात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. सुषमा अंधारे यांना संसदीय विचार मांडण्याचा अधिकार आहे. तुम्ही जे प्रश्न विचारले असते त्याचे उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. तुमच्यासारखे आम्ही काल-परवा पासून पक्षात काम करत नाही. तीस वर्षापासून मी काम करतोय, या शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी चांगलेच सुनावले.
दरम्यान, एखाद्या मतदारसंघात तुमच्यासारखे चारशे मते घेणारा मी नाही. भाषण करताना एखाद्याचा बाप काढला जातो. एखाद्याची जात काढली जाते. हे थांबवणे गरजेचे आहे, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. मुक्ताईनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार असेल तर त्यांचे स्वागतच आहे. यापूर्वीही उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात दोन सभा घेतल्या होत्या. त्यावेळी ते पक्षाचे कुटुंबप्रमुख होते. शेवटच्या माणसाला काय त्रास होता, याची जाणीव त्यांना असायला हवी होती, अशी खंत चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"