Maharashtra Politics: “संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत”; शिंदे गटातील नेत्याची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:53 PM2022-12-27T13:53:20+5:302022-12-27T13:54:10+5:30
Maharashtra News: संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात. पण आमचे सरकार पुढील १०-१५ वर्षे कायम राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Maharashtra Politics: महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, कथित भूखंड घोटाळा यांसह अनेकविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विधान परिषदेत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सीमाप्रश्नाचा मुद्दा लावून धरत, आमच्याकडे अजून खूप बॉम्ब आहेत, वातीही काढलेल्या आहेत. असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. यानंतर आता यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला शिंदे गटातील नेत्याने पलटवार करत खोचक टीका केली आहे.
विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत फार तथ्य नसल्याची भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मांडली. तसेच विरोधकांनी केलेले आरोप म्हणजे बॉम्ब नाहीत तर लवंगी फटाके असल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेला भूखंड घोटाळा बॉम्ब नाही तर काय आहे? देवेंद्र फडणवीस यांना या घोटाळा वाटत नाही? हे गंभीर आहे. हे योग्य नाही. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्याकडून आम्हाला या अपेक्षा नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले. यातच शिंदे गटातील नेते आणि आमदार संजय गायकवाड यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला.
संजय राऊत दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत
संजय राऊत हे दगडी फटाकेही फोडू शकत नाहीत, ते बॉम्ब काय फोडणार. सरकार पडण्याच्या त्यांच्या घोषणा या केवळ स्वप्नच राहतील. त्यांच्यापेक्षा शंभर पटीने पक्षप्रवेश आमच्याकडे आहे. संजय राऊतांना सरकार पडण्याचे दिवसा स्वप्न पडतात. पण, आमचे सरकार ही टर्म पूर्ण करून पुढेही १०-१५ वर्षे कायम राहील, असा विश्वास संजय गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दरम्यान, अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांनी वारकऱ्यांचा वेश धारण करत भजन म्हणत सरकार विरोधात आंदोलन केले. यावर संजय गायकवाड यांनी टीका केली. एकीकडे देवी-देवतांचा अपमान करायचा आणि त्याच आघाडीच्या नेत्यांनी वारकऱ्यांच्या वेशभुषेत इथे यायचे, ही किती विटंबना आहे? महाराष्ट्र वेडा आहे का? अशी विचारणा संजय गायकवाड यांनी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"