Maharashtra Politics: “उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते”: संजय शिरसाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 01:55 PM2022-10-24T13:55:39+5:302022-10-24T13:56:21+5:30
Maharashtra Politics: पंधरा मिनिटात पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखे आश्चर्य नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Maharashtra Politics: परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. या पावसामुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले. ऐन दिवाळीतील या संकटामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर पहिल्यांदाच पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) हे औरंगाबाद दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी थेट बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. त्यांच्या अडचणीही समजून घेतल्या. मात्र, उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना, आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते, असे म्हटले आहे.
आजार हा आजार असतो. दुसरे काही कुणी समजत असेल तर तो बालीशपणा म्हणावा लागेल. मी बातमी पाहिली. उद्धव ठाकरे आले. पंधरा मिनिटांचा दौरा केला. सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या घरी चहा पिण्यास गेल्यास किमान वीस मिनिटे लागतात. पण, पंधरा मिनिटांत पाहणी दौरा होत असेल, तर त्यासारखे आश्चर्य नाही, असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते
उद्धव ठाकरे आले. त्यांचे स्वागत आहे. पण, येऊन दिलासा न देता जाणे हे काही बरोबर नाही. आम्हाला दिलासा दिला असता तर येवढे रामायण घडलेच नसते, अशी टीकाही शिरसाट यांनी केली. दुसरीकडे, आयुष्यामध्ये अशी संकटे येत असतात. माझ्यावरही संकट आले होते. पण, आजारपणाच्या काळात मी एक पाहिले. आपण जर चांगली काम केलीत, तर लोकं आपल्यासोबत असतात. त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असतो. अनेकांचे फोन आले. अनेकांच्या शुभेच्छा आल्या. मुख्यमंत्र्यांपासून सर्वसामान्य कार्यकर्ता भेटायला आला होता. हिम्मत हारायची नसते. एकदा जे काही संकट असतात. त्याला सामोरे जावे लागते. कार्यकर्त्यांच्या आशीर्वादामुळे ठणठणीत होऊन त्यांच्या सेवेत रुजू झालो, असे शिरसाट यांनी नमूद केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"