बाळासाहेबांची सेना सत्तेवरून पायउतार होऊ न देण्याची खेळी
By Admin | Published: January 29, 2017 12:49 AM2017-01-29T00:49:55+5:302017-01-29T00:49:55+5:30
कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवू द्यायचा नाही, याकरिता शिवसेना-मनसेच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाटाघाटी अचानक ‘मातोश्री’कडून थांबवण्यात आल्या आहेत.
- संदीप प्रधान, मुंबई
कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसवू द्यायचा नाही, याकरिता शिवसेना-मनसेच्या नेत्यांमध्ये सुरू झालेल्या वाटाघाटी अचानक ‘मातोश्री’कडून थांबवण्यात आल्या आहेत. भाजपाला स्वबळावर चित करण्यात मनसेला वाटेकरी करून घेण्यास शिवसेनेतील काहींनी विरोध केला. मात्र, तरीही मनसेच्या केवळ जिंकून येऊ शकतील,
अशाच जागांवर उमेदवार उभे करून शिवसेनेला अपशकुन न करण्याचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.
भाजपासोबतची युती महापालिका निवडणुकीत तुटणार, हे दिसू लागल्यावर शिवसेनेतील काही मंडळींनी पुढाकार घेऊन मनसेसोबत समझोता करण्याची सूचना उद्धव ठाकरे यांना केली. त्यांच्याच सूचनेवरून वाटाघाटी सुरू झाल्या. मनसे मुंबईत शिवसेनेला मदत करील आणि शिवसेना नाशिकमध्ये मनसेला हात देईल, असा प्रस्ताव पुढे आला. मात्र, चर्चेचे घोडे दादर-माहिम येथे येऊन अडले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांत दादर-माहिमचा गड शिवसेनेने काबीज केला असला, तरी मागील महापालिका निवडणुकीत या परिसरात मनसेचे सात नगरसेवक विजयी झाले होते. मात्र, येथेच वाटाघाटी बिनसल्या. त्यानंतर, मातोश्री पुन्हा ‘नॉट रिचेबल’ झाली.
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने अचानक युती तोडल्यावर उद्धव-राज हे दूरध्वनीवर बोलले होते. त्यानंतर, दोन्ही बाजूंकडील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा झाली होती. मात्र, अचानक ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांनी त्यामध्ये बिब्बा घातला. मनसे आपल्या उमेदवारांना ‘ए’ व ‘बी’ फॉर्म वाटायची थांबली असताना, तिकडे शिवसेनेने आपल्या उमेदवारांना फॉर्म वाटून टाकले. या वेळी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे.
मात्र, आता राज यांनी आपल्या केवळ जिंकू शकतील, अशाच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपाचा महापौर बसू नये आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सत्तेवरून पायउतार होऊ नये, याकरिता आपण हा निर्णय घेत असल्याची घोषणा राज करण्याची शक्यता आहे. या भूमिकेमुळे राज यांच्याबद्दल शिवसैनिकांत आस्था, प्रेम निर्माण होईल, अशी मनसेला खात्री वाटते.
शिवसेनेतून विरोध का?
गेली २५ वर्षे ज्याला मित्र म्हटले, तो भाजपा गिळायला सिद्ध झाला असताना, ज्या मनसेने २००६ पासून डोकेदुखी दिली, तो पक्ष जागा वाटपाचा समझोता करून पुन्हा जिवंत करायचा कशाला, असा एक प्रबळ मतप्रवाह शिवसेनेत असून, हे मत असणारी मंडळी उद्धव यांची अत्यंत निकटवर्तीय आहेत. स्वबळावर लढून भाजपाला पराभूत करणे शक्य असताना, त्या यशात वाटेकरी कशाला घ्यावा, असे शिवसेनेतील मनसे विरोधकांचे मत आहे.