नाशिकमध्ये बांधणार बाळासाहेबांचे स्मारक
By admin | Published: September 16, 2015 12:58 AM2015-09-16T00:58:59+5:302015-09-16T00:58:59+5:30
मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत अपेक्षित प्रगती झालेली नसताना मनसेने मात्र नाशिक महापालिकेच्या माध्यमातून
नाशिक : मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत अपेक्षित प्रगती झालेली नसताना मनसेने मात्र नाशिक महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणारे शिवकालीन पुरातन वस्तूंचे संग्रहालय हेच बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक असेल, असे स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या मोबाइल अॅपच्या लोकार्पण सोहळ्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्मारकाची घोषणा करत बाळासाहेबांप्रति श्रद्धाभाव व्यक्त केला. मुंबई महापालिकेने रेसकोर्सवर बाळासाहेबांच्या स्मारकाची संकल्पना मांडल्यानंतर त्याला विरोध झाला होता.
राज यांनीही लोकोपयोगी प्रकल्पांच्या माध्यमातून स्मारक उभारण्याची सूचना केली होती. त्याचवेळी नाशिकमध्ये बाळासाहेबांचे स्मारक करण्यासाठी सेनेने आंदोलन केले होते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संग्रहातील शिवकालीन शस्त्रांस्त्रांचे संग्रहालय नाशिकच्या लौकिकात भर टाकेल, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)
नाशिक महापालिकेचे नवे अॅप
‘नाशिक महापालिकेच्या कामात पारदर्शकता आहे म्हणूनच मोबाइल अॅप्लिकेशन लोकांसमोर आले आहे. यापुढे आणखी चांगल्या गोष्टी शहरात घडतील. नाशिकचे अनुकरण इतरांनीही करावे, यासाठी सारे प्रयत्न सुरू आहेत,’ असे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितले. नाशिक महापालिकेने तयार केलेल्या मोबाइल अॅप्लिेशनच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित सोहळ्यात महापालिकेचे मोबाइल अॅप्लिकेशन, संगणकीय कार्यप्रणाली आणि स्मार्ट सिटी संकेतस्थळाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नाशिक शहरात झालेल्या आणि सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देतानाच भविष्यात होणाऱ्या प्रकल्पांचाही वेध घेतला.