बाळासाहेबांचे स्मारक दादर किंवा वांद्रय़ात!
By Admin | Updated: December 10, 2014 01:22 IST2014-12-10T01:22:39+5:302014-12-10T01:22:39+5:30
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक दादर किंवा वांद्रे भागात हे स्मारक व्हावे यासाठी समिती जागांचा शोध घेणार आहे.

बाळासाहेबांचे स्मारक दादर किंवा वांद्रय़ात!
यदु जोशी - नागपूर
शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक मुंबईत उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. दादर किंवा वांद्रे भागात हे स्मारक व्हावे यासाठी समिती जागांचा शोध घेणार आहे.
सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस.मिना, मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (1) मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव (2) श्रीकांत सिंह, कोकणचे विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया हे या समितीचे सदस्य आहेत. शिवसेनाप्रमुखांचे दादरवर विशेष प्रेम होते. याच भागात शिवसेना भवन आहे. त्यांनी दसरा मेळाव्यात लाखो शिवसैनिकांना विचारांचे सोने वाटले ते दादरमधील शिवाजी पार्कवरच. याच शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते. वांद्रे आणि बाळासाहेबांचे असेच अतूट नाते. याच भागात त्यांचे मातोश्री हे निवासस्थान आहे. हे भावनिक नाते लक्षात घेता दादर आणि वांद्रे या भागात स्मारकासाठी जागा शोधण्यावर समिती भर देणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. शासनाच्या मालकीच्या जागा किंवा खासगी जागा या दोन्ही पर्यायांचा शोध घेतला जाणार आहे.
स्मारकासाठी जागा शोधणो आणि स्मारकाचे स्वरूप निश्चित करणो हे समितीचे मुख्य काम असेल. त्याचा अहवाल समिती मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. गेल्यावर्षी शिवसेनाप्रमुखांच्या पहिल्या स्मृतिदिनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांचे स्मारक उभारण्यासंदर्भात पुढाकार घेण्याचे सूतोवाच केले होते. हे स्मारक उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी शिवसेनेचे काही नेते पवार यांना भेटलेदेखील होते. तथापि, स्मारकासाठी पवारांच्या दरबारी शिवसेनेला जावे लागत असल्याची टीकाही त्या निमित्ताने झाली होती. नंतर हा विषय पुढे सरकू शकलेला नव्हता.
शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अलीकडेच चर्चा केलेली होती. आता प्रत्यक्ष स्मारकाच्या उभारणीत उद्धवजींचे मार्गदर्शन समिती आणि सरकार घेईल, अशी अपेक्षा आहे.
- दिवाकर रावते, शिवसेनेचे नेते, परिवहन मंत्री.
शिवसेनाप्रमुखांचे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे स्मारक उभारण्यास शासन कटिबद्ध आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्या संदर्भात आधीही चर्चा झाली आहे आणि भविष्यातही केली जाईल.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.