बाळासाहेबांचे स्मारक लाल फितीशाहीत अडकले!
By admin | Published: January 22, 2016 03:48 AM2016-01-22T03:48:55+5:302016-01-22T03:52:49+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभारण्यात येईल, अशी घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबतीने करून दोन महिने उलटले; तरी या स्मारकाबाबत कोणतीही कार्यवाही अद्याप कागदोपत्रीदेखील सुरू झालेली नाही.
बाळासाहेबांच्या स्मारकाबाबत होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र शिवसेनेचे नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांपूर्वी पाठवले होते.
शिवसेनाप्रमुखांच्या तिसऱ्या पुण्यतिथीदिनी त्यांच्या स्मृतींना शिवाजी पार्कवर अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंसोबत महापौर बंगल्यात पत्र परिषद घेऊन स्मारक उभारणीची घोषणा केली होती. बाळासाहेबांचे स्मारक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे असेच होईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र त्यानंतर गेल्या दोन महिन्यात स्मारकाबाबत कोणतीही हालचाल शासकीयपातळीवर झाली नाही.
शासनाच्या या दप्तरदिरंगाईबद्दल शिवसेनेचे प्रवक्ते खा.संजय राऊत यांनी आज लोकमतशी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे आज जे स्थान आहे त्याचे मोठे श्रेय हे शिवसेनाप्रमुखांनाच जाते. सरकारी लालफितशाहीवर त्यांनी नेहमीच आसूड उगारले आणि आज त्यांचेच स्मारक लालफितशाहीमध्ये अडकले आहे ही दु:खाची बाब आहे. हे स्मारक उभारण्याचा शब्द मुख्ळमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिला आहे. त्यामुळे आतापर्यंत आदेश निघायला हवे होते. तसे न झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला किंमत आहे की नाही असा प्रश्न पडतो. (विशेष प्रतिनिधी)
राज यांचा होता विरोध
बाळासाहेबांचे स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यास मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी विरोध दर्शविली होता. तसे पत्रही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले होते. महापौर बंगला ही पुरातन वास्तु असून त्याऐवजी अन्यत्र ठिकाणी भव्य स्मारक उभारण्याची मागणी त्यांनी केली होती.
...........................
उद्योगमंत्री देसाई यांनी दिलेल्या पत्रावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त अजेय मेहता यांना दिले होते, मात्र शिवसेनेच्याच ताब्यात असलेल्या महापालिकेतून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे समजते.
बाळासाहेबांच्या नावे
निराधार स्वावलंबन योजना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजनेची घोषणा आज राज्य शासनाने केली. आत्महत्या केलेल्यांच्या विधवांना या योजनेंतर्गत आॅटोरिक्षा खरेदी करण्यासाठी १०० टक्के कर्ज देण्यात येणार आहे.
शासनाची मदत मिळण्यासाठी पात्र ठरलेल्या कुटुंबातील विधवांनाच हे कर्ज मिळेल आणि रिक्षा परवानाही दिला जाईल. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुुटुंबाला शासन एक लाख रुपयांची मदत देते. आॅटोरिक्षासाठी कर्ज घेताना हीच रक्कम हमी म्हणून वापरता येईल.