बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 07:41 AM2021-01-23T07:41:44+5:302021-01-23T07:42:25+5:30

प्रबोधनकारांच्या जीवनगाथेचे प्रकाशन महापौर या नात्याने सुधीर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या समारंभात शिवसैनिक पहिला हार बाळासाहेबांना घालू लागले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना थांबविले आणि म्हणाले, ‘पहिला मान महापौरांचा. 

Balasaheb's politics, his friendship and cricket | बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट

बाळासाहेबांचे राजकारण, त्यांची मैत्री अन् क्रिकेट

googlenewsNext

सुभाष देसाई, शिवसेना नेते व उद्योग मंत्री -

महाराष्ट्राच्या राजकारणात साचलेली घाण पाहून बाळासाहेब प्रचंड संतापत असत. ही घाण दूर करण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेबांनी केले. सर्व जातीपातीच्या लोकांना एकत्र करत हिंदुस्थानी ही एकच जात माना, असा त्यांचा आग्रह असायचा. शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन करताना प्रत्यक्ष कृतीतून साहेबांनी जगाला हे दाखवून दिले. ब्राह्मण कुटुंबात जन्म घेतलेला परंतु सर्वधर्मसमभाव मानणारा आणि समाजाच्या हिताचेच कार्य करणाऱ्या मनोहर जोशींकडे मुख्यमंत्री पदाची धुरा त्यांनी सोपविली. पण, त्या पहिल्या शिवशाहीत बबनराव घोलपांसारख्या दलित नेत्यांनाही मंत्री म्हणून संधी दिली. चंद्रकांत खैरे हे छोट्यात छोट्या बुरुड समाजात जन्मले. त्यांना कॅबिनेट मंत्री केले. लीलाधर डाकेंसारखे ओबीसी समाजपुत्र मंत्रिपदावर घेतले. मुस्लिम समाजाचे पण कट्टर शिवभक्त साबिर शेख यांना कामगार मंत्री केले. मंत्रिपद देण्यापूर्वी बाळासाहेबांनी साबिरभाईंना ‘मातोश्री’वर बोलावून घेतले आणि मीनाताईंना म्हणाले, ‘अगं! आपला साबिर मंत्री होतोय!’  त्यावर, मीनाताई तत्काळ म्हणाल्या, ‘होय! तो त्यांचा हक्कच आहे.’ साबिरभाईंसाठी तो आयुष्यभर लक्षात राहिलेला सुखद धक्का होता. प्रबोधनकारांच्या जीवनगाथेचे प्रकाशन महापौर या नात्याने सुधीर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्या समारंभात शिवसैनिक पहिला हार बाळासाहेबांना घालू लागले तेव्हा बाळासाहेबांनी त्यांना थांबविले आणि म्हणाले, ‘पहिला मान महापौरांचा. 

महापौर नंतर कोणत्याही पक्षाचा नसतो. तो त्या शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे पहिला हार महापौरांना घाला.’ ‘युती सरकारचा रिमोट माझ्या हाती आहे,’ असे बाळासाहेब नेहमी म्हणत. पण, त्यांनी तो रिमोट प्रत्यक्षात अगदी क्वचितच वापरला. त्यांच्या रिमोटचा कायमच एक धाक असायचा. प्रत्यक्षात त्यांनी घडविलेले शिवसैनिक अत्यंत निष्ठेने राज्य चालवत होते. महिलांना प्रोत्साहन देताना बाळासाहेबांना महिला आरक्षणाचा आधार घ्यावा लागला नाही. भावना गवळी यांना त्यांचे काम पाहून खासदारकीची त्यांनी पुन्हापुन्हा संधी दिली. नीलमताईंचे ते भरभरून कौतुक करत. भेटल्यावर, ‘कुठे धडक मारून आलात?’ असे कौतुकाने विचारत. तुम्हा पुरुषांना जमले नाही ते हिने करून दाखविले, असे कौतुक त्यांनी आमदार-खासदारांच्या बैठकीत केले होते.

मैत्री कशी जपावी हे बाळासाहेबांकडून शिकावे. ज्येष्ठ साहित्यिक आणि ‘सोबत’कार ग.वा. बेहेरे यांच्याशी बाळासाहेबांचे झालेले वैचारिक वाद त्या काळी फार गाजले. दोघांनी एकमेकांवर अगदी टोकाची टीका केली. वाढत्या वयाबरोबर वाद मागे पडले. एकदा उभयतांच्या फोनवर गप्पा झाल्या. प्रत्यक्ष गप्पा मारण्याची इच्छा बाळासाहेबांनी बोलून दाखविली तेव्हा, ‘वयामुळे मी कुठे बाहेर जात नाही,’ असे बेहेरे म्हणाले. बाळासाहेबांनी पुण्यातील कार्यकर्त्यांना मातोश्रीवर घेऊन येण्यास सांगितले. रमेश बोडके आणि रामभाऊ पारखी हे पदाधिकारी होते. पण, कोणाकडेच गाडी नव्हती. 

तेव्हा जिल्हाप्रमुख वापरत असलेल्या जुन्या जीपमधून ते बेहेरेंना मातोश्रीवर घेऊन गेले. ‘तुम्ही कसे आलात?’ असे विचारले तेव्हा ‘आम्ही जीपमधून आलो,’ असे बेहेरे म्हणाले. बेहेरेंकडे गाडी नाही हे समजल्यावर त्या भेटीनंतर तिसऱ्याच दिवशी बेहेरेंच्या निवासस्थानी नवी कोरी अ‍ॅम्बेसेडर मोटार भेट म्हणून पाठवून दिली. फोन करून, ती मोटार वापरा, असे बेहेरेंना आग्रहाने सांगितले. बेहेरेंनीही आपल्या दिलदार मित्राचा मान ठेवला आणि ती गाडी अखेरपर्यंत वापरली.

बाळासाहेबांचे क्रिकेट प्रेम जगजाहीर होते. तरुणपणापासून बाळासाहेबांचे क्रिकेटवर प्रेम जडले ते अखेरपर्यंत. माधव मंत्री, बापू नाडकर्णी, पॉली उम्रीगरसारख्या क्रिकेटपटूंशी त्यांनी अखेरपर्यंत मैत्री जपली. 

लोणावळ्याला जाताना गाडीतून क्रिकेटचे सामान नेऊन चारचौघांसोबत ते खेळात रंगून जात. पाकिस्तानशी बाळासाहेबांचे अगदी हाडवैर होते. पण, जावेद मियांदादच्या फलंदाजीवर बाळासाहेब निहायत खूश असायचे. ‘मातोश्री’वर जावेद मियांदादला बोलावून गप्पा मारल्या तेव्हा क्रिकेटप्रेमात राजकारण डोकावलेसुद्धा नाही. आपल्या क्रिकेटपटूंनी मैदानावर मर्दुमकी गाजवली तेव्हा अगदी पोरसवदा खेळाडूंना बोलावून त्यांना मान देत कौतुक करीत. वानखेडेच्या उभारणीवेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य देत महापालिकेची ताकद पुरेपूर वापरली. सचिनला भारतरत्न मिळावे म्हणून बाळासाहेबांनी कोणतेही प्रयत्न कमी पडू दिले नाहीत. क्रिकेटसारखेच उत्तुंग खिलाडू जीवन बाळासाहेब जगले.

बोफोर्स प्रकरण आणि अमिताभ...
बोफोर्स प्रकरणात अमिताभचे नाव ओढून वादळ निर्माण केले गेले. मीडियाने त्यांचे जगणे मुश्कील केले होते. त्या कसोटीच्या क्षणी बाळासाहेबांनी त्याची बाजू नीट समजून घेतली. म्हणाले, ‘तुझी बाजू जर सत्याची असेल तर डगमगू नकोस, धैर्याने सामोरे जा, जे खरे आहे ते जगाला ठणकावून सांग. मी तुझ्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा आहे.’ अमिताभ त्या धीराने सावरले. आत्मविश्वासाने पत्रकार परिषदेला सामोरे गेले. 



कोर्टकचेऱ्यांना तोंड दिले आणि सत्याची भूमिका जिंकली. अभिनयावर लक्ष केंद्रित केले आणि अमिताभ बच्चन शतकातील महानायक झाले. तसेच पाहिले तर दोघेही बिग बी. एक राजकारणातले तर दुसरे चित्रसृष्टीतले. पण, बाळासाहेबांनी अमिताभचा राजकारणासाठी वापर करण्याचा विचारसुद्धा मनात आणला नाही. त्या दोघांनीही निखळ मैत्री जपली.

Web Title: Balasaheb's politics, his friendship and cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.