Eknath Shinde: एक ढाल, दोन तलवार! बाळासाहेबांच्या शिवसेनेला चिन्ह मिळाले; शिंदे गटाला प्रादेशिक पक्षाची मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 06:13 AM2022-10-12T06:13:25+5:302022-10-12T06:14:18+5:30
‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात असलेल्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ या पक्षाला ‘दोन तलवार व ढाल’ असे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. तसेच या पक्षाला राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणूनही निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. उद्धव ठाकरे गटाला सोमवारीच मशाल हे चिन्ह मिळाले आहे. हे चिन्ह घरोघर पोहोचविण्याठी या गटाच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत.
‘दोन तलवार व ढाल’ चिन्ह यापूर्वी ‘पीपल्स डेमोक्रॅटिक मुव्हमेंट’ या पक्षाचे होते; परंतु या पक्षाला २००४ मध्ये नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून आलेल्या या प्रस्तावाला निवडणूक आयोग मान्यता देत असल्याचे आदेशात म्हटले आहे. या चिन्हाचा वापर अंधेरी पूर्व पोटनिवडणूक वा आयोगाचा अंतिम निर्णय येईपर्यंत वैध राहील, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.
‘सूर्य’ का नाही?
n शिंदे गटाने ई-मेलद्वारे मंगळवारी पसंतीक्रमानुसार चिन्हाचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे दिला होता. यात ‘सूर्य’ या चिन्हाला पहिली पसंती दिली होती.
n परंतु हे चिन्ह मिझोरामच्या एका प्रादेशिक पक्षाला दिलेले असल्याने ते चिन्ह आयोगाने नाकारले. दुसरे चिन्ह त्यांनी ढाल-तलवार मागितले होते.
n हे चिन्हही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट नाही. परंतु या चिन्हाशी साधर्म्य असलेले ‘दोन तलवार व एक ढाल’ हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे.