बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 12:38 PM2024-07-28T12:38:07+5:302024-07-28T12:38:25+5:30

मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

balbharati once more and bhin bhin bhingri | बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

बालभारती, वन्स मोअर अन् भिंग भिंग भिंगरी...

दुर्गेश सोनार, सहायक संपादक

मोरोपंतांच्या मोबाइलवर सक्काळी सक्काळी व्हॉट्सॲपचं नोटिफिकेशन आलं. त्यांनी डोळे चोळत चोळतच मोबाइल हातात घेतला आणि काय आलंय ते पाहिलं... त्यांचे डोळे विस्फारले... पहिलीच्या पाठ्यपुस्तकातली बालकविता कोणत्या तरी ग्रुपवर कुणी तरी धाडली होती. मोरोपंतांनी कविता वाचली आणि ते कमालीचे अस्वस्थ झाले. 

‘जंगलातली मैफिल’ कवितेतून मांडत असताना त्या कवयित्रीने केलेली शब्दांची ओढाताण पाहून मोरोपंतांचा रसभंग झाला. त्यांना जुन्या बालभारतीतल्या कविता आठवू लागल्या... खरंच, पूर्वीच्या (जुन्या काळातल्या) कविता अशा उथळ नव्हत्या. एकप्रकारचं नादमाधुर्य, लालित्य, कल्पनारम्यता, सहजता त्या जुन्या कवितांमध्ये होती. बालमनाला ‘भावे’ल अशा त्या कविता होत्या. पावसाची सर जशी झरझर यावी, तसे त्या कवितांमधले शब्द झरझर येत असत. त्यामुळेच तर त्या कवितांना पिढ्यान् पिढ्या ‘वन्स मोअर’ मिळत गेला आणि आजही त्या कविता इतक्या लख्ख लक्षात राहिल्या.  

देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो... अहाहा... ग. ह. पाटलांची काय ती कविता होती... बालभारतीतल्या अशा एकेक कविता मोरोपंतांना आठवू लागल्या. त्यांचं मनातल्या मनात चिंतन सुरू झालं... 

इतकं सुंदर खरं तर लिहिता आलं पाहिजे. पण छोट्या मुलांच्या भावविश्वाला आपलंसं वाटेल असं सोप्पं, सहज लिहिणं हेच खरं म्हणजे अवघड असतं. तरी, ‘ट ला ट, र ला र... म्हणे मी कविता करणार...’ अशी यमके कवी काहीच्या काही लिहून कवितेला उथळ करून टाकतात. अशा सुमार कवितांमुळे मुलांमध्ये साहित्याबद्दल आवड तरी कशी निर्माण होणार? आधीच मुलं कवितांपासून, पुस्तकांपासून दूर हरवत चालली आहेत मोबाइलच्या दुनियेमध्ये... त्यांच्यासमोर आभासी मायाजाल तंत्रज्ञानाने पसरवलेलं आहे. त्यात मुलं अडकू नयेत, यासाठी उत्तम दर्जाचं बालसाहित्य त्यांच्यासमोर यायला हवं... मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देईल, त्यांची सौंदर्यदृष्टी वाढवेल, त्यांचा भाषिक विकास करेल, अशा बालसाहित्याची गरज आहे. पण दुर्दैवाने सध्याच्या घडीला ही एक मोठी पोकळी मराठी बालसाहित्यात जाणवत आहे.

मोरोपंतांना ही सल प्रकर्षाने जाणवू लागली. त्यांना साने गुरूजींची आठवण झाली. ते म्हणाले होते, ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे...’  पण असे रंजनातून शिक्षण देणारे शिक्षक तरी आता कुठे राहिलेत शाळाशाळांमध्ये...? काही अपवाद नक्कीच असतील, पण तितकं पुरेसं नाही. बिनभिंतीच्या शाळेत बरंच काही शिकता येतं. पण त्याचं भान ना पालकांना ना इथल्या शिक्षण व्यवस्थेला... त्रिकोणी कुटुंबांमध्ये गोष्टी सांगणारे आजी-आजोबा घरात नाहीत, मग सांस्कृतिक संचिताचं बाळकडू मुलांना मिळणार तरी कसं?  असे एक ना अनेक प्रश्न पहिलीतल्या त्या एका बालकवितेने मोरोपंतांसमोर उभे ठाकले. बालभारतीतल्याच जुन्या कवितेतील भिंगरीप्रमाणे मोरोपंतांभोवती या प्रश्नांची भिंग भिंग भिंगरी फिरू लागली... आणि ते कमला पवार यांची ती कविता गुणगुणू लागले...

‘एक होती भिंगरी, भिंग भिंग भिंगरी
तिचं नाव झिंगरी, झिंग झिंग झिंगरी 
तिला आहे एक पाय
पायावरती गिरकी खाय 
सारखी सारखी फिरते गोल
फिरता फिरता जातो तोल
गिरकी खाऊन आली चक्कर
भिंतीवरती मारली टक्कर’  

Web Title: balbharati once more and bhin bhin bhingri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.