‘बळीराजा’ची जाळपोळ
By admin | Published: January 4, 2015 11:03 PM2015-01-04T23:03:45+5:302015-01-05T00:36:52+5:30
वाठारनजीक आंदोलन : आजपासून गनिमी कावा, शेतकरी संघटना आक्रमक
कऱ्हाड : ऊसदराच्या अनुषंगाने बळीराजा शेतकरी संघटना रविवारी आक्रमक झाली. संघटनेच्यावतीने पुणे-बंगलोर महामार्गावर वाठार ते मालखेड दरम्यान टायर पेटवून आंदोलन करण्यात आले. यावेळी काही वेळ महामार्गही रोखल्याची माहिती आंदोलकांनी दिली. दरम्यान, अचानकपणे झालेल्या या आंदोलनाची माहिती पोलीस प्रशासनालाही नव्हती.
कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी प्रतिटन २६00 ते २७00 रुपये दर जाहीर केला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी १७00 ते १८00 तर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी १५00 ते १६00 रुपये दर जाहीर केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांप्रमाणेच सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनीही दर द्यावा, अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेची आहे. बळीराजा संघटनेने त्यासाठी कारखानदारांना डेडलाईन दिली आहे. ‘बळीराजा’चे नेते पंजाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाठार-मालखेड मार्गावर आंदोलकांनी गाड्यांचे टायर पेटवून दिले. आंदोलकांनी घोषणा देत शासन आणि कारखानदारांचा निषेध केला. यावेळी अर्धा तास महामार्गही रोखला. पंजाबराव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार कऱ्हाडसह सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर जिल्ह्यांत सोमवारपासून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
शेट्टींचा इशारा; बळीराजाचे आंदोलन
खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर येथून चार दिवसांपूर्वी ऊसदराबाबत कारखानदारांना योग्य निर्णय घेण्याचा इशारा दिला होता; मात्र रविवारी कऱ्हाड येथे पंजाबराव पाटील यांच्या बळीराजा शेतकरी संघटनेकडून प्रत्यक्ष आंदोलन करण्यात आले़ राज्य सरकार, साखर कारखाने आणि साखर आयुक्तांकडून ऊसदराबाबत एक महिन्यापासून कोणताच निर्णय घेतला गेला नसल्याने अखेर ‘आर या पार’ अशी भूमिका घेत बळीराजा पेटून उठला अन् आंदोलन झाले़
...अन् बळीराजा पेटला
ऊसदराबाबत एक महिन्यापासून कारखानदारांकडून व सहकार आयुक्तांकडून कोणताच निर्णय घेतला गेला नसल्याने अखेर ‘आर या पार’ अशी भूमिका घेत बळीराजा पेटून उठला अन् आंदोलन झाले़
ऊसदर आंदोलनाचे यावेळचे स्वरुप गनिमी कावा आहे. सोमवारपासून सातारा, सांगली, पंढरपूर, सोलापूर या चार जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या चेअरमनांना अडवून, त्यांची गाडी फोडून तीव्र पद्धतीने आंदोलन करणार आहे.
- पंजाबराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटना