बाळकृष्ण वासनिक यांचे निधन
By Admin | Published: September 11, 2015 03:08 AM2015-09-11T03:08:31+5:302015-09-11T03:08:31+5:30
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस माजी केंद्रीय मंत्री
नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचे ते वडील होत. शुक्रवारी सकाळी १० वाजता गांधीनगर येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघून अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या मागे मुलगा मुकुल, मुलगी डॉ. दीप्ती व डॉ. सीमा, नातवंड व आप्त परिवार आहे.
बाळकृष्ण वासनिक काँग्रेस पक्षाशी आयुष्यभर एकनिष्ठ राहिले. त्यांच्या निधनामुळे काँग्रेसचा एक सच्चा मार्गदर्शक व पथदर्शी हरपल्याचे अ.भा. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सांगितले.
दलित शोषितांचे प्रश्न सोडविताना कुठल्याही प्रलोभनाला बळी पडायचे नाही व वैयक्तिक स्वार्थ ठेवायचा नाही हे दुर्मीळ मूल्य त्यांनी जपले, अशा भावना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणीमंत्री - नितीन गडकरी यांनी व्यक्त केल्या.
तर वासनिक यांच्या निधनाने आंबेडकरी विचारांचे नेतृत्व हरपले आहे. शैक्षणिक आणि कामगार क्षेत्रातही त्यांनी मोठे काम केल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
वासनिक यांच्या निधनाने शैक्षणिक व कामगार क्षेत्रात काम करणारे समर्थ नेतृत्व हरविल्याच्या भावना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केल्या. माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनीही शोक भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)