‘बल्लारपूर’चे रोजंदार कायम
By admin | Published: March 15, 2016 02:00 AM2016-03-15T02:00:22+5:302016-03-15T02:00:22+5:30
मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो
मुंबई: मे. बल्लारपूर इन्डस्ट्रिज लि. या कंपनीच्या (बिल्ट ग्राफिक पेपर प्रॉडक्ट््स लि.) चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील कारखान्यात गेली अनेक वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शेकडो कामगारांना अखेर नोकरीत कायम केले जाणार आहे.
या कामगारांचे प्रतिनिधित्व करणारी महाराष्ट्र लोक कामगार संघटना आणि ‘बिल्ट’ कंपनी यांच्यात १९९७ पासून सुरु असलेल्या तंट्यात गेल्या आठवड्यात उभयपक्षी सहमतीने तडजोड झाली. त्यानुसार असे ठरले की, कंपनीत काम करीत असलेल्या २२४ कामगारांपैकी जे कामगार रोजंदारीवर काम करीत होते त्यांना १ जानेवारी २०१० पासूनच्या पूर्वलक्षी प्रभावाने नोकरीत कायम केले जाईल.
यापैकी जे दरम्यानच्या काळात निवृत्त झाले असतील, मृत झाले असतील अथवा ज्यांनी राजीनामा दिला असेल असे ते या तारखेपासून कायम नोकरीत होते, असे मानून त्यांची सर्व देणी दिली जातील, असेही कंपनीने मान्य केले आहे.
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी दिलेल्या निकालाच्या विरुद्ध कंपनीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. कुरियन जोसेफ व न्या. रोहिंग्टन फली नरिमन यांच्या खंडपीठाने सुनावणीच्या दरम्यान दोन्ही पक्षांना हा तंटा सामोपचाराने मिटविण्याची सूचना केली. त्यानुसार वरीलप्रमाणे समझोता झाला व कंपनीचे अपील निकाली काढले गेले.
या खेरीज जे कामगार २४ आॅगस्ट २००९ ते १ जानेवारी २०१० या काळात नोकरी सोडून गेले असतील,
त्यांनाही कामावर असलेल्या कामगारांप्रमाणे नसले तरी सुयोग्य पैसे दिले जातील, असेही कंपनीने मान्य केले. (विशेष प्रतिनिधी)
पक्षपात दूर झाला, कंपनीने नमते घेतले
रोजंदार कामगारांना कायम करताना कंपनी पक्षपात करते. दोन्ही मान्यताप्राप्त संघटनांचे सदस्य असलेल्या हजारो कामगारांना गेल्या कित्येक वर्षांत कायम केले गेले. पण आमचे सदस्य अनेक वर्षे (काहीजण १९७४पासून) रोजंदारीवर काम करीत असूनही व त्यांनी वर्षात २४० दिवस सलग काम केलेले असूनही त्यांना कायम केले जात नाही, अशी महाराष्ट्र लोक कामगार संघटनेची मुख्य तक्रार होती.
अखेर मान्यताप्राप्त नसूनही याच संघटनेने कामगारांना न्याय मिळवून दिला. या कामगारांनी कधी २४० दिवस सलग काम केलेलेच नाही, असे म्हणणाऱ्या कंपनीलाही अखेर त्यांना कायम नोकरीत घ्यावे लागले.