‘बर्थडे सेलिब्रेशन’मध्ये फुग्यांचा स्फोट
By admin | Published: January 19, 2017 02:34 AM2017-01-19T02:34:56+5:302017-01-19T02:34:56+5:30
डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना घडल्याचे आज (बुधवारी) उघड झाले.
मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयात शुक्रवारी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना घडल्याचे आज (बुधवारी) उघड झाले. या प्रकरणी रुग्णालयातील चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवासाचा छोटेखानी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी हायड्रोजन गॅसयुक्त फुगे आणि फटाके आणले होते. या वेळी फटाक्यांची ठिगणी फुग्यांवर पडून हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत आॅडिओलॉजिस्ट सादिया अन्सारी ४० टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर निशा कांबळे, निवेदिता गायकवाड आणि हर्षदा साटम या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.
याविषयी डॉ. मिनी बोधनवाला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार देत फोन बंद केला. याबाबत पोलीस ठाण्यात कुणाबाबत तक्रार दाखल करण्यात आली नाही. याविषयी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडिया रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)