सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील संशयित आरोपी नगरसेवक बाळू खंदारे पोलिसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 19:53 IST2018-01-31T19:52:56+5:302018-01-31T19:53:51+5:30
सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित आरोपी नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याला बुधवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले.

सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील संशयित आरोपी नगरसेवक बाळू खंदारे पोलिसांच्या ताब्यात
सातारा : सुरुचि धुमश्चक्री प्रकरणातील गेल्या तीन महिन्यांपासून फरारी असलेला संशयित आरोपी नगरसेवक विनोद ऊर्फ बाळू खंदारे याला बुधवारी सायंकाळी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. आनेवाडी टोलनाका व्यवस्थापन हस्तांतरावरून खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये सुरुचि बंगल्यासमोर धुमश्चक्री झाली होती. यात शाहूपुरी पोलिसांनी उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह ३०० जणांवर गुन्हे दाखल केले होते. पोलिसांनी दोन्ही राजे समर्थकांची धरपकड सत्र सुरू केले होते.
तेव्हापासून शिवेंद्रसिंहराजे समर्थक बाळू खंदारे फरारी होता. त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळल्यापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान, उपविभागीय अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. बुधवारी सायंकाळी पोलिसांना बाळू खंदारे साता-यामध्ये आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी सापळा रचून आरटीओ कार्यालय परिसरात बाळू खंदारेला ताब्यात घेतले.