सलोख्याचा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर!

By Admin | Published: February 15, 2015 01:37 AM2015-02-15T01:37:02+5:302015-02-15T01:37:02+5:30

राज्यभर पोहोचताच राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या अनोख्या उपक्रमाची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचे कौतुक केले.

Balocha 'Bourdi Pattern' in the state! | सलोख्याचा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर!

सलोख्याचा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर!

googlenewsNext

पोलीस महासंचालकांनी घेतली दखल : पोलिसांनी गावात वाटले पेढे
शिवाजी गोरे - दापोली (जि. रत्नागिरी)
दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील हिंदू-मुस्लीम समाजाने केलेला सामाजिक सलोख्याचा करार ‘लोकमत’च्या माध्यमातून राज्यभर पोहोचताच राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनी या अनोख्या उपक्रमाची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचे कौतुक केले. विशेष म्हणजे सलोख्याचा हा ‘बुरोंडी पॅटर्न’ राज्यभर राबविण्याचा निश्चयही त्यांनी केला आहे.
बुरोंडीतील हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकत्र येत १०० वर्षांचा सामाजिक सलोख्याचा करार केला. कधी काळी जातीय तणावाखाली असलेले हे गाव आज गुण्यागोविंदाने नांदत आहे. सर्व सण-उत्सव सर्वधर्मसमभावाने साजरे होत आहेत. बुरोंडीकरांनी उचलेले हे प्रागतिक पाऊल ‘लोकमत’च्या माध्यमातून प्रकाशात येताच पोलीस महासंचालक संजीव दयाळ
यांनी रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बुरोंडी गावात पाठवून गावच्या या उपक्रमाचे जाहीर कौतुक करण्यास सांगितले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी बुरोंडी गावाला भेट देऊन गावकऱ्यांचे अभिनंदन केले आणि गावभर पेढेही वाटले.

‘लोकमत’चे आभार
सामाजिक सलोख्याची दखल घेत बुरोंडी ग्रामस्थांचा उपक्रम राज्यभर पोहोचवल्याबद्दल बुरोंडीच्या ग्रामस्थांनी ‘लोकमत’चे आभार व्यक्त केले. ‘लोकमत’ने हे वृत्त १ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केले होते.

संवेदनशील गावाचा कलंक या कराराने पुसला असून, आता नवा पायंडा सुरू झाला आहे. गावात किंवा पंचक्रोशीत समन्वय समितीची जबाबदारी वाढली आहे. सामाजिक सलोख्याची जबाबदारी आम्ही नक्कीच पेलू. - प्रदीप राणे, सरपंच, बुरोंडी

Web Title: Balocha 'Bourdi Pattern' in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.