हळदीमध्ये सामिष भोजनाला बंदी
By Admin | Published: April 26, 2016 03:20 AM2016-04-26T03:20:49+5:302016-04-26T03:20:49+5:30
लग्नातील हळदी समारंभ मांसाहार आणि मद्यप्राशनाशिवाय साजरे केले जातील असा महत्वपूर्ण निर्णय रामजन्मोत्सवानिमित्त घेण्यात आला
नागोठणे : पेण तालुक्यातील खारकालई (आमटेम) येथील ग्रामस्थांनी यापुढे होणाऱ्या साखरपुडा तसेच लग्नातील हळदी समारंभ मांसाहार आणि मद्यप्राशनाशिवाय साजरे केले जातील असा महत्वपूर्ण निर्णय रामजन्मोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वर पारायण समारंभाच्या समारोपाप्रसंगी घेण्यात आला असल्याची माहिती भिकाजी नाईक यांनी दिली.
आगरी समाजातील बहुतांशी गावांमध्ये लग्न समारंभात जुने रीतीरिवाज सोडून काही अनिष्ट प्रथा वाढू लागल्याने सर्वसामान्य माणसांना आपल्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह करताना फार मोठया आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत असते. साखरपुडा तसेच हळदी समारंभाला ऐंशी ते शंभर किलो मटण आणि हजारो रु पयांचे मद्य आणावे लागत असते. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी नाईलाजाने हा खर्च त्याला करावा लागत असल्याने प्रचंड असा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असतो. खारकालई गावातील तरु णांनीच पुढाकार घेत रामजन्मोत्सवाच्या मुहूर्तावर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून आपल्या घरात यापुढे होणाऱ्या विवाह सोहळ्याच्या कार्यक्र मात असे अनिष्ट प्रकार न करणाऱ्या कुटुंबांचा जाहीर सत्कार सुद्धा करण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले. (वार्ताहर)