पक्षी-प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घाला
By admin | Published: August 6, 2016 05:22 AM2016-08-06T05:22:42+5:302016-08-06T05:22:42+5:30
क्रॉफर्ड मार्केटमध्ये चालणाऱ्या पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी
मुंबई : क्रॉफर्ड मार्केटमध्ये चालणाऱ्या पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकार, पोलीस व संबंधित प्रशासनाला नोटीस बजावली आहे. चार आठवड्यांत या नोटीसवर उत्तर देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले आहेत.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये विक्रीसाठी असलेल्या प्राण्यांना व पक्ष्यांना अयोग्य पद्धीतीने ठेवण्यात येते. एका छोट्या पिंजऱ्यात अनेक प्राण्यांना व पक्ष्यांना कोंबण्यात येते. त्यामुळे अॅनिमल वेल्फेअर बोर्डाला अशाप्रकारे पाळीव प्राण्यांची व पक्ष्यांची विक्री करणाऱ्या दुकांनाना नियमित करण्यासाठी नियम तयार करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी जनहित याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
‘डोळे न उघडलेल्या कुत्र्यांच्या पिल्लांनाही त्यांच्या आईपासून दूर केले जाते. रडू नयेत म्हणून त्यांना औषधेही दिली जातात. तर मांजरीच्या पिल्लांची नखे लागू नयेत म्हणून ती मुळांसकट काढली जातात. तसेच पक्ष्यांच्या टोकदार चोची गरम सुरीने कापल्या जातात,’ असे याचिकेत म्हटले आहे.
पर्यावरण व वन मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, १९९३ पासून क्रॉफर्ड मार्केटमधून आठ हजार प्राणी, पक्ष्यांना व्यापाऱ्यांच्या तावडीतून सोडवण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, घटनेच्या अनुच्छेद २१ नुसार जीवन जगण्याचा अधिकार केवळ माणसांपुरताच मर्यादित नसून सर्व सजीवांनाही लागू होतो. प्रीव्हेन्शन आॅफ क्रुअल्टी टू अॅनिमल्स अॅक्टनुसार, जो कोणी प्राण्यांचा, पक्ष्यांचा
सांभाळ करतो, त्याने प्राण्याची किंवा पक्ष्याची योग्य ती काळजी घेणे बंधनकारक आहे, असेही याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)