राज्यात रासायनिक खतांवर बंदी घालणार : रामदास कदम यांचे सूतोवाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 09:44 PM2019-01-30T21:44:03+5:302019-01-30T21:47:18+5:30
महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल, असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.
दापोली : महाराष्ट्रात यापुढे रासायनिक खतांवर बंदी घालण्यात येणार असून प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर घेतलेला हा फार मोठा क्रांतिकारी निर्णय असेल, असे सूतोवाच राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.
राज्याच्या पर्यावरण विभागामार्फत राज्य सरोवर संवर्धन योजनेंतर्गत उंबरशेत येथील तळ्याचे नुतनीकरण व सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचे भूमिपूजन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याहस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, राज्यात २२७ नगरपालिका आणि २७ महानगरपालिका आहेत. त्यांच्या हद्दीत जमा होणाºया कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे. तसेच गायी, म्हशी, गोठ्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून शेतकºयांकडून शेण विकत घेऊन त्या माध्यमातूनही सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे.
हे खत शेतकºयांना ५० टक्के सवलतीत देण्यात येणार आहे, असे कदम म्हणाले.रासायनिक खते ही विषासमान आहेत. खतांच्या मात्रेने कर्करोगासारख्या दुर्धर व्याधी जडतात. माणसाचे आयुष्यही १५ ते २० वर्षांनी कमी होते, असे तज्ज्ञांचे मत आहे. याचा विचार करून रासायनिक खते बंद करण्याबाबत विचार सुरू असल्याचे कदम यांनी सांगितले.
या कार्यक्रमात त्यांनी विरोधकांवरही टिका केली. कोकणावर सातत्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने अन्याय केला. पश्चिम महाराष्ट्रात १९ टक्के सिंचन क्षमता असून कोकणामध्ये केवळ ती एक टक्के आहे. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील सिंचनासाठी एक हजार कोटींचा निधीचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला. त्यावेळी कोकणावर अन्याय होऊ देणार नाही असे सांगत आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ४५० कोटी रुपयांचा निधी मिळविला, असे ते म्हणाले. या वेळी युवासेनेचे कोअर कमिटी सदस्य योगेश कदम, विधानसभा संपर्क प्रमुख दादा गोवले, उपजिल्हाप्रमुख शंकर कांगणे आदी उपस्थित होते.