दारू दुकानात आता पाणी, खाद्यपदार्थ विकण्यास बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:45 AM2018-05-29T06:45:14+5:302018-05-29T06:45:14+5:30
दारू दुकानांत पाणी, सॉफ्ट ड्रिंक किंवा खाद्यपदार्थांच्या विक्रीस उत्पादन शुल्क विभागाने बंदी घातली आहे.
डॉ. खुशालचंद बाहेती
मुंबई : दारू दुकानांत पाणी, सॉफ्ट ड्रिंक किंवा खाद्यपदार्थांच्या विक्रीस उत्पादन शुल्क विभागाने बंदी घातली आहे. यासाठी १९५३च्या बॉम्बे विदेशी मद्यविक्री नियमांतील तरतुदींचा आधार घेण्यात आला आहे.
यापूर्वी उत्पादन शुल्क विभागाने गेल्या महिन्यात मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवरील मद्याची जाहिरात करणारे बोर्ड उतरवले होते. त्यासाठीही त्यांनी अस्तित्वात असलेल्याच नियमांचा आधार घेतला होता.
दारूच्या दुकानावर फक्त ६० बाय ९० सेंटिमीटर आकाराचा बोर्ड लावता येतो. यावर परवाना क्रमांक व दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ लिहिणे बंधनकारक आहे. या नियमाची अंमलबजावणी न केल्यास कारवाईचा बडगा उगारताच दारू दुकानांवरील मोठमोठ्या दारूच्या जाहिरातींचे फलक काढून घेण्यात आले. आता पुन्हा उत्पादन शुल्क विभागाने नियमांचा आधार घेत दारू दुकानांतून होणाºया पाणी, सॉफ्ट ड्रिंक, सोडा, खाद्यपदार्थ यांची विक्री केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
मद्य दुकानात पाणी, सोडा व खाद्यपदार्थ विक्री होत असल्याने ग्राहक दुकानांसमोर उभे राहूनच दारू पितात, अशी तक्रार अनेक निवासी वसाहतींतून होत होती. याला काही प्रमाणात आळा बसेल. आता दारू दुकानांजवळ हातगाड्यांवर या पदार्थांची विक्री होणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशीही मागणी होत आहे.