गोवंश मांस बंदी, डान्स बारबाबत अंमलबजावणी
By Admin | Published: May 12, 2016 03:32 AM2016-05-12T03:32:23+5:302016-05-12T03:32:23+5:30
गोवंश मांस बंदीबाबत आणि डान्सबार सुरु करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. त्याबाबत अद्याप न्यायालयाकडून पूर्ण सूचना आलेल्या नाहीत.
मुंबई: गोवंश मांस बंदीबाबत आणि डान्सबार सुरु करण्याबाबत न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अंमलबजावणी करण्यात येईल. त्याबाबत अद्याप न्यायालयाकडून पूर्ण सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे डान्सबारवर अधिक भाष्य करणे योग्य होणार नाही, असे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी बुधवारी सांगितले. मुंबईत पोलिसांच्या आठ तास ड्युटीबाबत प्रायोगिक तत्त्वावर काम सुरु आहे. त्याला यश मिळाल्यास तो पॅटर्न सर्वत्र लागू करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना आयुक्त पडसलगीकर यांनी विविध विषयांवर मते मांडली. गोवंश मांस बंदीबाबत उच्च न्यायालयाने नुकताच दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने विचारले असता. ते म्हणाले की, बीफ बाळगण्यावर आता कारवाई होणार नाही. त्याबाबत कोर्टाने जे निर्देश दिले आहेत, त्यानुसार किंवा त्याची अंमलबजावणी केली जाईल. डान्सबार बाबत न्यायालयात अद्याप सुनावणी सुरु आहे. शुक्रवारी त्याबाबत न्यायालयात सुनावणी होणार आहे. कोर्टाच्या अंतिम आदेशानंतर त्यानुसार डान्सबारला परवानगी बाबतच्या सूचना दिल्या जातील.
मुंबई पोलिसातील भ्रष्टाचारी अधिकारी, कमचाऱ्यांवर ‘एसीबी’ कडून कारवाईचे प्रमाण वाढल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले असता ते म्हणाले, गैरवर्तन, अधिकारांचा गैरवापर न करण्याबाबत आपण पहिल्या दिवसापासून
सूचना करत आहोत. ज्यांच्यावर
‘ट्रॅप’ ठेवलाय त्यांच्यावर आमच्याकडून तातडीने कारवाई केली जात आहे.
पोलिसांना आठ तासाची ड्युटी लागू करण्याच्या अनुषंगाने देवनार पोलीस ठाण्यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबविला जात आहे. त्यासाठी तीन शिफ्टमध्ये ड्युुटीचे नियोजन केले असून त्याला प्रतिसाद कसा मिळतो, त्याबाबत नेमलेल्या मुलांच्या समितीचा अहवाल यांचा विचार करुन ही संकल्पना सर्वत्र राबवण्याबाबत निर्णय घेतला
जाईल. (प्रतिनिधी)‘त्या’ वरिष्ठ निरीक्षकाला सूचना
टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय खैरे यांच्या कार्यपद्धतीबाबत पोलीस ठाण्यातील अन्य सर्व अधिकाऱ्यांनी तक्रार
करत अन्यत्र बदली मागितली आहे. यासंदर्भातले वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते.
याबाबत विचारणा केली असता, आयुक्त म्हणाले, की वरिष्ठ निरीक्षकांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर अन्य काही बाबतीतील आवश्यकतेनुसार बदल करण्यात आला आहे. खैरे यांच्याबाबत पुन्हा तक्रारी आल्यास कारवाई केली जाईल.