खाजगी बसमधून मालवाहतुकीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:37 AM2019-02-26T05:37:07+5:302019-02-26T05:37:12+5:30

परिवहनमंत्र्यांचे आदेश : एसटी चालकांसह वाहकांवर कठोर कारवाईचा इशारा

Ban on private buses goods transport | खाजगी बसमधून मालवाहतुकीला बंदी

खाजगी बसमधून मालवाहतुकीला बंदी

Next

मुंबई : प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालवाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. परवाना रद्द केल्यानंतर संबंधित बस जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय विनापरवानगी कुरियर किंवा मालवाहतूक नेताना आढळल्यास एसटीचालक व वाहकावर प्रथम निलंबन, तर दुसऱ्या वेळेस बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत-आपटा बसमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.


एसटी बसमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या घटनेनंतर तातडीने परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे रावते यांनी सांगितले. ते म्हणाले की, पोलिसांनी राज्यात कुठेही आणि कधीही खासगी व एसटी बसेसची तपासणी करावी. यापुढे परिवहन विभागाची त्यास हरकत नसेल. तसेच प्रत्येक एसटी स्टँडवर पोलीस चौकी उभारण्याबाबत त्यांनी गृह विभागाला विचारणा करतानाच स्टँडवर जागा देण्याची तयारी दर्शवली. परिवहन विभागाने यासंदर्भात नव्याने नियमावली तयार करण्याचे आदेशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.


दरम्यान, मालवाहतुकीच्या आडून प्रवाशांना जीवाला धोका निर्माण करणाºया बसेसवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला एसटीप्रमाणेच २० किलोपर्यंत सामान नेण्याची नियमावली तयार केली जाईल. तसेच बसमध्ये प्रवासी नसताना मालाची वाहतूक करता येणार नसल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. मालवाहतुकीसाठी प्रवासी वाहतुकीमधील बसेसचा वापर करू नये, असे आदेशही त्यांनी दिले. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी बसेसमधून मालवाहतूक करणाºया खासगी बसेसचा परवाना रद्द करून बस जप्त करण्याच्या सूचनाही त्यांनी परिवहन विभागास दिल्या. या बैठकीत गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासह परिवहन व गृह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

एसटीमध्ये सीसीटीव्ही लागणार?
एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतही विचार करत असल्याचे परिवहनमंत्री रावते यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच खासगी बसगाड्यांमध्येही सीसीटीव्ही लावता येतील का, याचा विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Ban on private buses goods transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.