शाळांमध्ये राजकीय व संवेदनशील कार्यक्रमांना बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 08:44 PM2020-01-14T20:44:59+5:302020-01-14T21:13:58+5:30
राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रांमध्ये शाळा व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने शैक्षणिक शिस्त बिघडते...
पुणे : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांच्या आवारात आयोजित राजकीय तसेच संवेदनशील कार्यक्रांमध्ये शाळा व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतल्याने शैक्षणिक शिस्त बिघडते. तसेच विद्यार्थ्यांच्या बालमनावर चुकीचे संस्कार होवून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीत बाधा येते. त्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट आदेश राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिले आहेत.
मुंबईतील एका शाळेत राजकीय व संवेदनशील कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी केल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे राज्यातील सर्व शिक्षण उपसंचालक कार्यालयांना व जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना परिपत्रकाद्वारे शाळांमधील होणाऱ्या राजकीय कार्यक्रमांबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, महानगर पालिकेच्या शाळा, नगर पालिकेच्या शाळा व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांना शैक्षणिक शिस्त बिघडवणारे व बालमनावर चुकीचे संस्कार घडविणारे राजकीय कार्यक्रम आयोजित करता येणार नाही.
दत्तात्रय जगताप म्हणाले, मुंबई येथे एका शाळेत झालेल्या राजकीय कार्यक्रमाची माहिती घेण्याचे आदेश मुंबईतील शिक्षण उपसंचालकांना देण्यात आले आहेत. संबंधित शाळेची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल मागविला जाणार आहे. त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आदेशाचे उल्लंघन करून शाळांनी राजकीय कार्यक्रमांचे आयोजन केले तर संबंधित शाळेवर शासनाकडून प्राप्त होणाऱ्या सूचनेनुसार कारवाई केली जाईल. तसेच शिक्षण हक्क कायदा आणि इतर कायद्यांच्या आधारे कार्यवाही करण्यात येईल.