धान्यांची पाकीटबंद बियाणी महागणार
By admin | Published: July 16, 2017 04:13 AM2017-07-16T04:13:33+5:302017-07-16T04:13:33+5:30
खुली अन्नधान्ये, डाळी तसेच बियाणे यांच्यावर जीएसटी लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी रजिस्टर्ड व ब्रँडनेम असलेल्या गहू, मका, ज्वारी
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : खुली अन्नधान्ये, डाळी तसेच बियाणे यांच्यावर जीएसटी लागणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी रजिस्टर्ड व ब्रँडनेम असलेल्या गहू, मका, ज्वारी, बाजरी (Cereals) आदींच्या पाकिटबंद बियाण्यांवर ५ टक्के जीएसटी आकारला जाणार आहे.
औरंगाबाद येथील चार्टडं अकाउंटंट सुमित ठोले यांनी ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की या तेलबियांच्या बियाण्यांबाबत जशी स्पष्टता कायद्यात आहे, तशी धान्यांच्या पाकिटबंद बियाण्यांच्या बाबतीत नाही. परिणामी धान्याच्या पाकिटबंद बियाण्यांवर ५ टक्के जीएसटी लागेल आणि त्यांच्या किंमती महाग होतील.
ठोले म्हणाले की, तेलबियांना जीएसटी लागू होणार नसल्याचा स्पष्ट उल्लेख चॅप्टर १२ मध्ये आहे. पण धान्यांच्या ब्रँडेड बियाण्यांसंदर्भात तसा उल्लेख नाही. हा उल्लेख राहून गेला असावा, असा अंदाज आहे. मात्र सरकारला ते स्पष्ट करावे लागेल.
आतापर्यंत या बियाण्यांवर व्हॅट वा एक्साइज ड्यूटी नव्हती.
आता मात्र जीएसटी आकारणीमुळे धान्यांची ब्रँडेड बियाणी महाग होतील. बियाण्यांवर जीएसटी लागू होणार नाही, असे जाहीर झाल्यानंतर ब्रँडेड, रजिस्टर्ड व पाकिटबंद बियाण्यांवर ५ टक्के जीएसटी आकारण्यात येईल, असे कळल्यामुळे शेतकरी तसेच कृषी सेवा मंडळे गोंधळात आहेत.
- अन्नधान्ये, कडधान्ये, डाळी या सुट्या विकल्यास त्यावर जीएसटी लागणार नाही. मात्र या वस्तू पाकिटबंद स्वरूपात विकल्यास त्यावर ५ टक्के जीएसटी लागणार आहे. त्यामुळे अनेक डाळ मिलवाल्यांनी आपले बँ्रड व ट्रेड मार्क रद्द केले आहेत.