अवघ्या ५०० ते १००० रुपयांत बांगलादेशी बनताहेत भारतीय; ११ महिन्यांत १५६ जण हद्दपार; ६ महिलांचे प्रत्यार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 07:19 IST2025-01-02T07:18:28+5:302025-01-02T07:19:31+5:30
गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.

प्रतिकात्मक फोटो
मुंबई : बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहेत. अशात तेथील गरिबी आणि उपासमारीला कंटाळून अनेक बांगलादेशी घुसखोर अवैध मार्गाने आंतरराष्ट्रीय सीमा रेषा ओलांडून भारतात येत आहे, तसेच ते अवघ्या पाचशे ते दोन हजारांत ते भारतीय ओळखपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे बनवत असल्याचे चौकशीत समोर आले. गेल्या अकरा महिन्यांत मुंबईतून अशा १५६ बांगलादेशींना हद्दपार करण्यात आले, तर ६ महिलांचे प्रत्यार्पण करण्यात आले आहे.
राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गेल्या आठवड्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि सोलापूर, नाशिक जिल्ह्यात विशेष मोहीम राबवून महिनाभरात ४३ बांगलादेशींना अटक केली. भारतातील वास्तव्यासाठी या आरोपींनी बनावट कागदपत्रांआधारे आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून घेतल्याचे उघड होते. विशेष शाखा एकच्या आय शाखेकडून २०२४ मध्ये सजामुक्त बांगलादेशी नागरिकांवरील कारवाई अहवालानुसार, अकरा महिन्यांत १५६ जणांवर हद्दपारची कारवाई केली आहे. यापैकी फक्त सहा बांगलादेशीचे प्रत्यार्पण करण्यात आले. यापैकी काही जण पाचशे ते दोन हजारांत भारतीय कागदपत्रे मिळवल्याचे तपासात समोर येत आहे. गेल्या वर्षी एकट्या मुंबईतून ३६८ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. त्यापूर्वी २०२२ मध्ये मुंबईतून १४७ बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती.
संपूर्ण साखळीविरोधात कारवाई
बांगलादेशी नागरिकांना अटक केल्यानंतर त्यांना मायदेशी पाठण्याच्या प्रक्रियेला अनेक वर्षे लागतात. त्या काळात घुसखोर बांगलादेशी नागरिक विविध सरकारी योजनांचा फायदा घेतात.
त्यांच्या इतर बांगलादेशी घुसखोरांना भारतात स्थायिक करण्याचे बेकायदेशीर काम ते करतात. त्यामुळे घुसखोरांना कागदपत्रे व मदत पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीविरोधातच कारवाई करण्यास एटीएसने सुरुवात केली आहे.
त्या अंतर्गत संशयित बांगलादेशी नागरिकांची बँक खाते बंद करण्याबाबत बँकांना नोटीस पाठवण्यास सुरुवात करण्यात आली आहे, तसेच शिधापत्रिका, चालक परवाने रद्द करण्याबाबतही संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला जाताे.
- गेल्या तीन वर्षांत ६९६ बांगलादेशी नागरिकांना अटक
- २२२ बांगलादेशी मायदेशी रिटर्न...
भिवंडीत वाढतोय वावर
गेल्या ११ महिन्यांमध्ये ठाणे शहर आयुक्तालयाने ५० हून अधिक बांगलादेशींना जेरबंद केले. भिवंडीमध्ये उत्तर प्रदेश, बिहारचाही मुस्लिम वर्ग असल्यामुळे त्यांच्यात बांगलादेशी सहज मिसळतात. त्यामुळे बांगलादेशींना नेमके शोधून काढून त्यांच्यावर कारवाईचे आव्हान पोलिसांपुढे आहे.