बंजारा समाजाकडून २२ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 01:57 AM2019-02-13T01:57:35+5:302019-02-13T02:01:14+5:30
बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय बहुजन क्रांती दलाने येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २२ जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
मुंबई : बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या भारतीय बहुजन क्रांती दलाने येत्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २२ जागांवर निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. भारतीय जनता पार्टीकडून फसवणूक झाल्याचा आरोप करत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी मुंबई मराठी पत्रकार भवन येथे ही घोषणा केली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांत मध्यप्रदेश, तेलंगणा या राज्यांत बीबीकेडीच्या उमेदवारांकडून प्रस्थापितांना मोठे हादरे बसले होते. त्याची पुनरावृत्ती राज्यातील लोकसभा निवडणुकांत दिसेल, असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातील २२ जागांवर उमेदवार देण्याच्या निर्णयावर एकमत झाले आहे. बंजारा समाजाची राज्यात सव्वा कोटी, तर देशात १२ कोटी एवढी लोकसंख्या आहे.
देशात १२५ जागा लढविणार
राज्यातील २२ जागांसह संपूर्ण देशात १२५ जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यात राज्यातील दक्षिण मुंबई, कल्याण-डोंबिवली, जळगाव, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, जालना, अहमदनगर, अकोला, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, धुळे, रावेर, बुलढाणा, चंद्रपूर, लातूर, भिवंडी, पंढरपूर, नाशिक येथे लोकसभा निवडणुकीत बंजारा उमेदवार रिंगणात उभे राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.