बंजारा समाजाला हवे एसटी प्रवर्गात आरक्षण

By Admin | Published: July 22, 2016 08:37 PM2016-07-22T20:37:06+5:302016-07-22T20:37:06+5:30

राज्यातील बंजारा समाजाच्या राहणीमानाचा अभ्यास करून त्यांचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये करावा, अशी मागणी भारतीय बंजारा क्रांती दल संघटनेने केली आहे.

Banjara community needs reservation in ST category | बंजारा समाजाला हवे एसटी प्रवर्गात आरक्षण

बंजारा समाजाला हवे एसटी प्रवर्गात आरक्षण

googlenewsNext

 शिष्टमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

मुंबई : राज्यातील बंजारा समाजाच्या राहणीमानाचा अभ्यास करून त्यांचा समावेश अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गामध्ये करावा, अशी मागणी भारतीय बंजारा क्रांती दल संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दिल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मोरसिंग राठोड यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राठोड म्हणाले की, देशातील ९ राज्यांमध्ये बंजारा समाजाला अनुसूचित जातींचे (एससी), तर ६ राज्यांमध्ये एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळत आहे. याउलट महाराष्ट्र ,मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशमध्ये इतर प्रवर्गांत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे समाजाचे नुकसान होत आहे. राज्यातील एसटी, एससी आणि ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता बंजारा समाजासाठी एसटी प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवण्याची मागणी राठोड यांनी केली आहे. तसे निवेदन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांना दिला आहे. त्यानंतर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी यांनाही मागणीचे निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील बंजारा समाजाची भाषा, राहणीमान, वेशभुषा, चालीरिती आणि संस्कृती, देवी-देवता एकच असल्याचे संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ओंकार जाधव यांनी सांगितले. जाधव म्हणाले की, अनुसूचित जमातींसाठी आवश्यक निकषांची पूर्तता
बंजारा समाज करतो. वेगळी संस्कृती, गावापासून वेगळे राहणे, भौगोलिक वेगळेपण, समाजापासून विभक्त तांड्यामध्ये राहणे असे सर्व निकष बंजारा समाजात दिसतात. त्यामुळे घटनेप्रमाणे त्यांना प्रत्येक राज्यांत अनुसूचित जाती किंवा जमातींचे आरक्षण मिळायलाच हवे. उत्तरप्रदेशातील राज्य सरकारने केंद्र शासनाला तेथील बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातींमध्ये करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याप्रमाणे येथील राज्य सरकारनेही तसा प्रस्ताव पाठवण्यासाठी केंद्राने चौथा मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याची मागणी संघटनेने केल्याचे जाधव यांनी सांगितले.

Web Title: Banjara community needs reservation in ST category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.