Maharashtra Political Crisis: “चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 12:29 PM2022-08-12T12:29:50+5:302022-08-12T12:30:02+5:30
Maharashtra Political Crisis: विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असताना या घडामोडींमध्ये बंजारा समाजाने उडी घेतल्याने एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेऊन ३८ दिवस झाल्यानंतर अखेर मंत्रिमंडळाच्या मुहुर्ताला मूर्त रुप आले. यात भाजपच्या ९ आणि शिंदे गटातील ९ आमदारांनी शपथ घेतली. मात्र, पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी मागील मंत्रिमंडळातून राजीनामा द्याव्या लागलेल्या संजय राठोड यांना नव्या सरकारने पुन्हा एकदा मंत्री केल्यावरून विरोधकांनी नव्या शिंदे-भाजप सरकारवर टीकेचे आसूड ओढले आहे. यातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, असे आवाहन बंजारा समाजाकडून करण्यात आले आहे.
बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे, ते आता देवेंद्र फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रिमंडळात दिसणार आहे. ज्या भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी राळ उठवली होती, आंदोलने केली होती तेच आता भाजपसोबत मंत्री असणार आहेत. त्यामुळे, भाजपची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल
चित्रा वाघ यांनी नमती भूमिका घेतली तरच हा वाद मिटेल अन्यथा हा अन्याय समाजाकडून सहन केला जाणार नाही, असा इशाराही बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. संजय राठोड यांच्यावर वेळोवेळी करण्यात येणाऱ्या टीकेनंतर बंजारा समाजाने आता याप्रकरणी विरोधी भूमिका घेतली असून, चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना राखी बांधावी, अन्यथा रस्त्यावर उतरु असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला आहे. संजय राठोडांवर केली जाणारी टीका देशातील सबंध बंजारा समाजावर केली जात आहे. त्यामुळे चित्रा वाघ यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या महंतांनी नाराजीचा सूर आळवला असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारात संजय राठोड यांना संधी देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. राठोड यांच्या शपथविधीनंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच विरोधकांकडून सरकावर टीकेची झोड उठवली जात असताना आता या सर्व घडामोडींमध्ये बंजारासमाजाने उडी घेतली आहे. त्यामुळे आता आणखी एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.