बँक खाती, रोख रकमेवर ‘वॉच’
By admin | Published: February 16, 2017 09:12 PM2017-02-16T21:12:09+5:302017-02-16T21:12:09+5:30
महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेत विविध पथक अधिक सजग झाले आहे.
बँक खाती, रोख रकमेवर ‘वॉच’
अमरावती : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपल्याने महापालिकेत विविध पथक अधिक सजग झाले आहे. २१ फेब्रुवारीला होऊ घातलेल्या प्रत्यक्ष मतदानाआधी १९ फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजता जाहीर प्रचार संपुष्टात येईल त्यानंतर १९ आणि २० ची रात्र ‘वैऱ्याची’ राहील. या पार्श्वभूमिवर उमेदवारांच्या बँक खाती व रोख रकमेच्या व्यवहारावर अधिक सुक्ष्मपणे लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्त हेमंत पवार यांनी यंत्रणेला दिल्या आहेत.
महापालिका निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण ६२८ उमेदवारांमध्ये अनेक उमेदवार ‘धनदांडग्या’च्या श्रेणीत मोडतात, तर मतदानाआधी विशिष्ट वस्त्यांमध्ये रोख रक्कम वाटली जात असल्याचा इतिहास आहे. या अनुषंगाने निवडणूक आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी संवेदनशील भागांसाठी विशेष पोलीस व्यवस्था करण्यासोबतच रोख रकमेच्या खर्चावर आणि बँकांमधील संशयित व्यवहारावर नजर ठेवली जात आहे. तीन लाखांपेक्षा अधिक रोकड कुणाकडे आढळल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे. रात्रीच्या वेळी येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी भरारी पथकाबरोबरच स्थानिक पोलिसांची मदत घेण्याचे आदेश पालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी दिले आहेत.
मतदारांना प्रभावित करण्यासाठी कितीही रकमेचे वाटप केले, तर त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश आयुक्तांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. आचारसंहिता काळात प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत किती गुन्हे दाखल केलेत, आरटीओ विभागाने किती वाहनांवर कारवाई केली, याचा अहवाल दररोज आयुक्तांना सादर होत आहे. बँकेमध्ये होणाऱ्या संशयित व्यवहारावर नजर ठेवण्याच्या सूचना लिड बँकेचे सुनील रामटेके यांना देण्यात आले असून अशा प्रकारे उघड झाल्यास त्यांनी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस विभाग किंवा आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवावे, अशा सूचना संनियंत्रण समितीचे प्रमुख म्हणून आयुक्तांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)