नागपूरात बँकेच्या रोखपालाचा कक्षातच मृत्यू
By admin | Published: November 18, 2016 04:34 PM2016-11-18T16:34:00+5:302016-11-18T16:34:00+5:30
कामाचा ताण असह्य झाल्यामुळे एका बँक अधिका-याचा त्यांच्या कक्षातच मृत्यू झाला. रामपंतलू व्यंकटेश राजू (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 18 - कामाचा ताण असह्य झाल्यामुळे एका बँक अधिका-याचा त्यांच्या कक्षातच मृत्यू झाला. रामपंतलू व्यंकटेश राजू (वय ५०) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे उपराजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गांधीनगर शाखेत रामपंतलू कस्टमर असिस्टंट या पदावर कार्यरत होते. नोटाबंदीमुळे बँकेच्या अधिकारी, कर्मचा-यांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. गेल्या आठ दिवसांपासून बँकेत ग्राहकांची झुंबड उडाल्यामुळे अधिकारी अन् कर्मचा-यांची अक्षरश: त्रेधातिरपट उडत आहे. दैनंदिन व्यवहार सांभाळतांनाच संतप्त ग्राहकांची समजूत घालण्यातही बँकेचे अधिकारी, कर्मचारी गुंतले आहे. सकाळपासून रात्रीउशिरापर्यंत सुरू असलेले काम आणि प्रचंड दडपण यामुळे अनेक बँक अधिकारी, कर्मचा-यांची अवस्था चांगली नाही. अशाही स्थितीत ते आपले कर्तव्य पार पाडत आहेत.
रामपंतलू अशाच प्रकारे आज सकाळी गांधीनगर शाखेत कर्तव्यावर आले आणि रोखपालाचे कर्तव्य बजावू लागले. सकाळी ११ पासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. मात्र, पाण्याचा घोट घेत त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. ११.३० च्या सुमारास रोकड मोजत असताना अचानक रोखपालाच्या कक्षात बसून असलेल्या खुर्चीवरच ते कोलमडले. त्यांनी डोळे वर केले आणि तोंडातून फेस आल्यामुळे समोरच्या ग्राहकांनी बाजुला असलेल्या बँकेच्या दुस-या अधिकारी, कर्मचा-याच्या लक्षात ही बाब आणून दिली. रामपंतलू यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात आल्यामुळे बँकेत एकच खळबळ उडाली. आरडाओरड, गोंगाट वाढला. बँक अधिकारी, कर्मचा-यांनी त्यांना लगेच शंकरनगर चौकातील एका खासगी इस्पितळात नेले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची वार्ता गांधीनगर शाखेसह उपराजधानीतील सर्वच बँकांमध्ये वायुवेगाने पोहचली. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. माहिती कळताच बँकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच अंबाझरी पोलीस इस्पितळात दाखल झाले. गांधीनगर शाखेतही मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.