आज बँक बंद!
By admin | Published: November 14, 2016 04:57 AM2016-11-14T04:57:15+5:302016-11-14T04:55:56+5:30
गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र, ८ नोव्हेंबरपासून चलनातून पाचशेच्या नोटा बंद केल्याने, सोमवारीही मोठ्या संख्येने
मुंबई : गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी देशातील सर्व बँका बंद राहणार आहेत. मात्र, ८ नोव्हेंबरपासून चलनातून पाचशेच्या नोटा बंद केल्याने, सोमवारीही मोठ्या संख्येने ग्राहक बँकेबाहेर उभे राहून गोंधळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी केंद्र सरकारने शनिवारी आणि रविवारी सुट्टी असतानाही बँक सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते. या वेळी सोमवारची सार्वजनिक सुट्टी मात्र कायम ठेवण्यात आली होती. त्यामुळे बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांना आराम मिळण्यासाठी सोमवारची सुट्टी रद्द झालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर गुरुनानक जयंतीची सुट्टी रद्द केल्याने सोमवारी बँका सुरू राहतील, असे खोटे मेसेज व्हायरल झाले आहेत. परिणामी, मोठ्या संख्येने बँकेतून पैसे काढण्यासाठी, भरण्यासाठी आणि नोटा बदलण्यासाठी लोकांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीनंतर चलनातून पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर, बुधवारी बँक बंद ठेवली होती. मात्र, चलनात नव्या २ हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध व्हाव्यात, म्हणून नियोजित वेळेच्या एक तास आधी बँक उघडण्याचे आदेश दिले होते. बँक कर्मचाऱ्यांनीही नियोजित वेळेआधी बँक उघडून ठरलेल्या वेळेनंतर बँक बंद केली होती. त्यानंतरही लोकांची गैरसोय होत असल्याने, सुट्टी रद्द करून बँक कर्मचाऱ्यांना काम करण्याचे आदेश सरकारने दिले होते. सर्व एटीएम सुरू होण्याचा दावाही सरकारने केला होता. मात्र, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी एटीएम सेवा सुरू होण्यास काही अवधी लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सोमवारी बँक बंद ठेवल्यानंतर, काही प्रमाणात सुरू असलेली एटीएम सेवाही कोलमडेल. (प्रतिनिधी)