गरिबांसाठी शैक्षणिक साहित्याची बँक

By admin | Published: June 9, 2016 03:01 AM2016-06-09T03:01:40+5:302016-06-09T03:01:40+5:30

नेरूळमधील ‘जाणता राजा’ तरुण मित्र मंडळाने गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.

Bank of Education material for the poor | गरिबांसाठी शैक्षणिक साहित्याची बँक

गरिबांसाठी शैक्षणिक साहित्याची बँक

Next


नवी मुंबई : नेरूळमधील ‘जाणता राजा’ तरुण मित्र मंडळाने गरीब विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. नागरिकांकडून जुने किंवा नवीन पुस्तके, कपडे व इतर शैक्षणिक साहित्य संकलित करून ते विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले जात आहे.
आपली मदत एखाद्या गरजू विद्यार्थ्याचे भविष्य घडवू शकते, असे आवाहन करत ‘जाणता राजा’ तरुण मित्र मंडळाने गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य संकलित करण्याची मोहीम सुरू केली. कोणावरही सक्ती न करता स्वेच्छेने जे मदत करतील ती विद्यार्थ्यांसाठी संकलित केली जात आहे. नवीन किंवा जुनी पुस्तके, कपडे, स्कूलबॅग, वॉटरबॅग व शाळेसाठी साहित्य मिळविले जात आहे. अनेक नागरिकांनी नवीन वह्या, पुस्तके व इतर साहित्य जमा करण्यास सुरवात केली आहे.
शैक्षणिक साहित्य संकलनाच्या मोहिमेविषयी माहिती देताना ‘जाणता राजा’च्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, मध्यमवर्गीय व आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले पालक त्यांच्या मुलांना प्रत्येक वर्षी नवीन शैक्षणिक साहित्य घेतात. परंतु दुसरीकडे गरीब मुलांना आवश्यक तेवढेही साहित्य मिळत नाही. ज्या विद्यार्थ्याच्या वडिलांचे निधन झाले व आईकडे उत्पन्नासाठी नोकरी किंवा व्यवसायाचे साधन नसेल अशा मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच थांबत असते. या सर्वांचा शैक्षणिक प्रवास सुकर व्हावा यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. मंडळामधील नीलेश दौंडकर, अजित खताळ, शाहूराज सोळसकर, प्रतीक बोदरे, संजय शेवाळे, विनायक शिंदे, निखील साळुंखे, अनिकेत देसाई, सागर सोनावणे, विनय देसाई व इतर
अनेक तरुण यासाठी परिश्रम घेत आहेत. (प्रतिनिधी)
>मदतीसाठी हात आले पुढे
‘जाणता राजा’ तरुण मित्र मंडळाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देवून प्रणोती रायकर, गगनदीप सिंग, मोहन इंदलकर, रमेश सूर्यवंशी व इतर अनेक नागरिकांनी जुनी पुस्तके, वह्या व इतर साहित्य स्वेच्छेने दिले आहे. पुढील पंधरा दिवस ही मोहीम सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी शक्य तेवढी मदत करावी, असे आवाहन केले आहे.

Web Title: Bank of Education material for the poor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.