बँक कर्मचाऱ्यांना डांबले; पैसे न मिळाल्याने नागरिकांचा संताप
By admin | Published: November 17, 2016 08:39 PM2016-11-17T20:39:04+5:302016-11-17T20:39:04+5:30
येथील मुशावरत चौकातील जनता बँक शाखेतून एक हजार व पाचशेच्या नोटा रांगेत उभे राहूनही बदलून न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बँकेच्या दहा कर्मचाऱ्यांना
ऑनलाइन लोकमत
मालेगाव (नाशिक), दि. 17 : येथील मुशावरत चौकातील जनता बँक शाखेतून एक हजार व पाचशेच्या नोटा रांगेत उभे राहूनही बदलून न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बँकेच्या दहा कर्मचाऱ्यांना तब्बल तीन तासाहून अधिक काळ बँकेत डांबून ठेवले होते. शहर पोलिसांनी बँक शाखेकडे धाव घेवून संतप्त नागरिकांची समजूत काढत मध्यस्थी केली. उशिरा बँक कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. निर्णयाच्या नवव्या दिवशीही शहरातील विविध बँक शाखांबाहेर नागरिकांची गर्दी दिसून आली.
येथील मुशावरत चौकातील जनता बँक शाखेबाहेर नागरिकांनी सकाळपासून नोटा बदलण्यासाठी गर्दी केली होती. दिवसभर रांगेत उभे राहूनही काही नागरिकांना नोटा बदलून देण्यात आल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज गुरूवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बँक शाखेचे मुख्य प्रवेशद्वाराचे शटर डाऊन करुन बँकेतील दहा कर्मचाऱ्यांना अक्षरश: डांबून ठेवले होेते. या प्रकाराची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांना मिळताच त्यांनी बँक शाखेकडे धाव घेवून आंदोलनकर्त्या नागरिकांची समजूत काढली. यानंतर डांबून ठेवलेल्या कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. दरम्यान चलनाअभावी शहरातील व्यवहार ठप्प झाले आहेत.