कर्जमाफीच्या कामासाठी बँकांची महाशिवरात्रीची सुट्टी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 12:52 PM2018-02-13T12:52:31+5:302018-02-13T12:52:42+5:30
स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा सुरू राहणार आहेत.
मुंबई : सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत मंजूर रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रमुख बँकांची महाशिवरात्रीची सुट्टी रद्द केली आहे. यामध्ये राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अन्य बँकांच्या महाराष्ट्रातील सर्व शाखा सुरू राहणार आहेत.
ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या अर्जातील माहिती बँकेकडील माहितीशी न जुळल्याने कर्जमाफीचा लाभ अद्याप देण्यात आलेला नाही, अशा शेतकऱ्यांची माहिती पुन्हा नोंदवावी, असे आदेशही बँकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील त्रुटींवरून विरोधक सातत्याने सत्ताधाऱ्यांना लक्ष करत आहेत. एकूण शासनाने दावा केलेल्या 89 लक्ष शेतकऱ्यांपैकी अर्ज भरण्याच्या अडचणींतून केवळ 77 लक्ष शेतकरी अर्ज भरू शकले, त्यामुळे पहिल्या फटक्यात 12 लक्ष शेतकरी कमी झाले. त्यातही तपासणी करुन 69 लक्ष शेतकऱ्यांचे अर्ज विचारात घेतले गेले म्हणजे 8 लक्ष अजून कमी करण्यात आले. अशा तऱ्हेने 20 लक्ष शेतकरी कमी केले गेले. यानंतर शासनाने ग्रीन लिस्ट जारी करत 69 लक्ष शेतकऱ्यांपैकी केवळ 47 लक्ष शेतकऱ्यांना पात्र ठरवून अजून 22 लक्ष शेतकऱ्यांवर अपात्रतेची तलवार टांगली आहे आणि त्यांना कायम स्वरुपी पिवळ्या, लाल यादीत प्रलंबित ठेवण्याचा घाट शासनाने घातला आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता.