मिरजेत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडले, रखवालदाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2017 01:25 PM2017-09-27T13:25:43+5:302017-09-27T13:26:14+5:30
मिरजेत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली.
मिरज - मिरजेत बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरट्यांनी राजाराम कृष्णा जाधव (वय ६०) या रखवालदाराची हत्या केली. शहरातील प्रमुख रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.
येथील शिवाजी रस्त्यावर बँक ऑफ इंडियाची शाखा व एटीएम आहे. एटीएमवर रात्रपाळीला राजाराम जाधव हे रखवालदार होते. मध्यरात्री एटीएममध्ये शिरलेल्या चोरट्यांनी जाधव यांच्या डोक्यात काठीने प्रहार करून यंत्र फोडले. मात्र एटीएमधील कॅश बॉक्स चोरट्यांना फोडता आली नसल्याने सुमारे दहा लाखाची रक्कम बचावली.
आज सकाळी एटीएम फोडल्याचे व राजाराम जाधव यांचा मृतदेह दिसल्यानंतर बँक अधिका-यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. अतिरिक्त पोलिस अधिक्षक शशिकांत बोराटे, उपअधीक्षक धीरज पाटील, पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार, पिंगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.
जाधव यांच्या हत्येसाठी वापरलेली काठी मृदेहाजवळ होती. डोक्यात काठीच्या फटक्याने खुर्चीवर बसलेल्या ठिकाणीच जाधव यांचा मृत्यू झाला. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमे-यात दोन चोरटे एटीएम मशिन फोडताना दिसून आले आहेत. रात्री एक ते तीन दरम्यान हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा संशय आहे. एटीएम फोडून रखवालदाराच्या हत्येचे वृत्त समजताच आज सकाळी बँकेसमोर मोठी गर्दी झाली होती. याप्रकरणी शहर पोलिसांत अज्ञाताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.