बँक आॅफ महाराष्ट्रने केले ३४ हजार डेबिट कार्डस् ब्लॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 06:00 AM2016-10-26T06:00:59+5:302016-10-26T06:00:59+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ३४ हजार डेबिट कार्ड बंद (ब्लॉक) केले आहेत. तथापि, कोणत्याही शाखेच्या ग्राहकाकडून
पुणे : सार्वजनिक क्षेत्रातील बँक आॅफ महाराष्ट्रने सुरक्षेच्या कारणास्तव खबरदारीचा उपाय म्हणून ३४ हजार डेबिट कार्ड बंद (ब्लॉक) केले आहेत. तथापि, कोणत्याही शाखेच्या ग्राहकाकडून अद्याप व्यवहारात फसगत वा संशयास्पद व्यवहार झाल्याची तक्रार आलेली नाही, असे सरव्यवस्थापक (आयटी) नरेंद्र काबरा यांनी सांगितले.
बँक आॅफ महाराष्ट्रने २१ हजार व्हिसा आणि १३ हजार रुपे कार्डसह एकूण ३४ हजार कार्डस् ब्लॉक केले आहेत. या बँकेने एकूण ५९ लाख डेबिट कार्डस् जारी केलेले आहेत. ग्राहकांची फसगत होऊ नये, तसेच त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये, याची खबरदारी घेऊन हे कार्डस् ब्लॉक करण्यात आले आहेत. आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर वापर होत असलेले सर्व डेबिट कार्डस् ब्लॉक केले आहेत, असे बँक आॅफ महाराष्ट्रने सांगितले.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरासाठी जारी करण्यात आलेले कार्डस् गरज भासल्यास नजीकच्या शाखेतून सक्रिय (अॅक्टिव्हेट) केले जाऊ शकतात, असे संदेश आम्ही एसएमएस व ई-मेलद्वारे ग्राहकांना पाठविले आहेत, असे काबरा यांनी सांगितले.
भारताबाहेर गेल्या एका महिन्यात ज्या ग्राहकांनी कार्डस्चा वापर केला, अशा ग्राहकांकडूनही आम्ही त्यांचे कार्डस् बंद करण्याची परवानगी मागितली आहे. सर्व ग्राहकांना नव्याने मोफत कार्डस् जारी केले जाणार आहेत. कार्डस् बदलून घेण्यासंबंधीचे संदेश त्यांना पाठविले जात आहेत, असे बँक आॅफ महाराष्ट्रने सांगितले.