बॅँक कर्मचाऱ्यांना हवे ‘वन रँक वन पेंशन’
By admin | Published: February 10, 2016 12:53 AM2016-02-10T00:53:43+5:302016-02-10T00:53:43+5:30
बँकेतील निवृत्त कर्मचारी वर्गाच्या बेसिक पेंशनमध्ये गेल्या २३ वर्षांत वाढ झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आॅल इंडिया बँक रिटायरिज फेडरेशनने ‘वन रँक वन पेंशन’ची मागणी करत
मुंबई : बँकेतील निवृत्त कर्मचारी वर्गाच्या बेसिक पेंशनमध्ये गेल्या २३ वर्षांत वाढ झालेली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या आॅल इंडिया बँक रिटायरिज फेडरेशनने ‘वन रँक वन पेंशन’ची मागणी करत बुधवारी धरणे आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात दीड हजार निवृत्त बँक कर्मचारी सामील होतील, अशी माहिती संघटनेने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संघटनेचे अध्यक्ष शरद देशपांडे म्हणाले की, इंडियन बँक असोसिएशन निवृत्त बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे. निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनेसोबत साधी चर्चा करण्याचे औदार्यही आयबीए दाखवत नाही. त्यामुळे आयबीएला जाब विचारण्यासाठी बुधवारी, १० फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता आझाद मैदानात महाधरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
राज्यात २५ हजारांहून अधिक निवृत्त बँक कर्मचारी व अधिकारी आहेत, असे संघटनेचे उप सरचिटणीस अशोक पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले की, ‘पूर्वी निवृत्त झालेल्या बँकेतील व्यवस्थापकीय प्रबंधकाला आजच्या चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्याहून कमी पेंशन मिळत आहे. ही तफावत सुधारण्याचा संघटनेचा प्रश्न आहे. त्यासाठी पेंशनमधील उणिवा सुधारण्याची मागणी संघटनेने केली आहे.’