बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न
By admin | Published: July 13, 2015 01:07 AM2015-07-13T01:07:18+5:302015-07-13T01:07:18+5:30
शनिवारी दुपारी पावणेदोनची वेळ... तोंडाला फडके बांधून तरूण वाऱ्याच्या वेगाने एका बँकेच्या शाखेत शिरला... त्याने सोबत आणलेली बंदूक सुरक्षा रक्षकाच्या छातीवर रोखली
प्रशांत काळबेंडे , जरूड (अमरावती)
शनिवारी दुपारी पावणेदोनची वेळ... तोंडाला फडके बांधून तरूण वाऱ्याच्या वेगाने एका बँकेच्या शाखेत शिरला... त्याने सोबत आणलेली बंदूक सुरक्षा रक्षकाच्या छातीवर रोखली आणि त्याला व्यवस्थापकाजवळ नेले. लगेच रोखपालाला बँकेतील रक्कम पिशवीत भरण्याच्या सूचना दिल्या. बँकेतील कर्मचारी आणि उपस्थित ग्राहकांच्या तोंडचे पाणीच पळाले. पण, व्यवस्थापकाने प्रसंगावधान राखून युवकाने ताणलेली बंदूक खेचली. संधी साधून इतर कर्मचाऱ्यांनी त्याला पकडले आणि अनर्थ टळला.
एखाद्या चित्रपटात शोभणारी ही घटना स्टेट बँक आॅफ इंडियाच्या येथील शाखेत घडली आहे. दरोड्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव सागर बाबाराव चरपे (२१) आहे. शनिवार असल्याने बँकेचे कामकाज दुपारी दीड वाजेपर्यंत सुरू होते. यावेळी बँकेत व्यवस्थापक सोनुसिंग सुरेंद्रसिंग, रोखपाल मुकेश त्रिवेदी, विशाल देवके, अशोक कावरे, किशोर बेलसरे हे सहा कर्मचारी आणि काही खातेदार होते. बँक खातेदारांनी घाबरून जाऊ नये. त्यांची रक्कम सुरक्षित असल्याचे सोनू सिंग यांनी सांगितले.