तोतया बँक अधिकाऱ्याने २९ हजारांना लुटले!
By admin | Published: January 11, 2015 01:45 AM2015-01-11T01:45:29+5:302015-01-11T01:45:29+5:30
स्टेट बँकेच्या तोतया शाखाधिकाऱ्याने येथील एका तरुणाकडून फोनवर एटीएम कार्डच्या पिनसह इतर माहिती घेऊन त्याला २९ हजार रुपयांना लुटले. पोलिसांनी मात्र तक्रार घेण्यास नकार दिला.
पाथर्डी (जि. अहमदनगर) : स्टेट बँकेच्या तोतया शाखाधिकाऱ्याने येथील एका तरुणाकडून फोनवर एटीएम कार्डच्या पिनसह इतर माहिती घेऊन त्याला २९ हजार रुपयांना लुटले. पोलिसांनी मात्र तक्रार घेण्यास नकार दिला.
नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे मला तुमच्या बँक खात्याचे व्हेरीफिकेशन करायचे आहे़ व्हेरीफिकेशन केले नाही तर खात्यावरील सर्व पैसे बुडतील, असे मोबाइलवर सांगत या ठकसेनाने तिसगाव येथील कापड दुकानात कामगार आदिनाथ दत्तात्रय गोंधणे याला फसविले.
आदिनाथचे कासारपिंपळगाव येथे स्टेट बँकेत बचत खाते आहे. शुक्रवारी रात्री त्याला मोबाइलवर फोन आला़ मी स्टेट बँकेचा शाखाधिकारी असून, तुमचा खाते क्रमांक द्या, असे त्याने सांगितले. त्यावर उद्या खाते क्रमांक सांगतो, असे आदिनाथने सांगितले. मात्र खात्यावरील पैसे बुडतील असे तोतया अधिकाऱ्याने सांगताच आदिनाथने खात्याची माहिती दिली. त्यानंतर तुमच्या एटीएमची पिन बदलली, असे त्या भामट्याने सांगितले. मात्र आदिनाथ शनिवारी एटीएम केंद्रावर गेला असता त्याला खात्यावर २९ हजार रुपये कमी असल्याचे समजले़ त्याने बँकेत चौकशी केल्यानंतर त्यास फसविले गेल्याचे स्पष्ट झाले.
आदिनाथने पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला़ मात्र, पोलीस निरीक्षक बी.डी. पारेकर यांनी तक्रार घेण्यास नकार देत आदिनाथला बँकेत तक्रार करण्याचा शहाजोगपणाचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)