बँक फोडून पावणेसात लाखांसह तिजोरी पळविली

By admin | Published: June 19, 2016 06:08 PM2016-06-19T18:08:39+5:302016-06-19T18:08:39+5:30

मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा तालुक्यातील मंगरूळ शाखा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडली़ बँकेची तिजोरी उघडत नसल्याने चोरट्यांनी ६ लाख ७३ हजार ३९८ रूपयांसह तिजोरी पळविली़

The bank was robbed of money by breaking the bank | बँक फोडून पावणेसात लाखांसह तिजोरी पळविली

बँक फोडून पावणेसात लाखांसह तिजोरी पळविली

Next

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 19 - किल्लारी पिकविमा वाटपापोटी आलेल्या रकमेचा अंदाज घेऊन लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा तालुक्यातील मंगरूळ शाखा अज्ञात चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री फोडली़ बँकेची तिजोरी उघडत नसल्याने चोरट्यांनी ६ लाख ७३ हजार ३९८ रूपयांसह तिजोरी पळविली़ या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. 
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची औसा तालुक्यातील मंगरूळ येथे शाखा आहे. या शाखेअंतर्गत मंगरूळसह गुबाळ, सारणी, हासलगन, नांदुर्गा या गावांचा समावेश आहे. सध्या जिल्हा बँकेच्या विविध शाखांतून पिकविम्याचे वाटप सुरू आहे. त्यामुळे मंगरूळच्या शाखेस शेतकऱ्यांच्या पिकविमा वाटपासाठी रक्कम आलेली होती. गेल्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांना पिकविमा वाटप सुरू आहे. त्यामुळे बँक सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होती़ पिकविमा उचलण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची गर्दी पाहून शनिवारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बँक सुरू ठेऊन शेतकऱ्यांना विम्याचे वाटप सुरू केले होते. विमा वाटप झाल्यानंतर नेहमीप्रमाणे कर्मचाऱ्यांनी बँक बंद केली आणि घराकडे गेले. दरम्यान, गावात पावसाला सुरुवात झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे सर्वत्र अंधार पसरला होता.
बँकेकडे मोठ्या प्रमाणात रक्कम आली असल्याचा अंदाज अज्ञात चोरट्यांनी घेऊन मध्यरात्री बँकच्या शटरची कुलूपे तोडली़ आतमध्ये प्रवेश करत टेबलसह अन्य ठिकाणी तिजोरीच्या चाव्यांची शोधाशोध केली. त्यानंतर तीन फूट उंचीची तिजोरी उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु ती उघडत नसल्याने चोरट्यांनी तिजोरीच उचलली़ सदरील तिजोरी मोठ्या वाहनात घालून पसार झाले़ रविवारी सकाळी गावातील जिल्हा बँकेची शाखा फोडल्याची चर्चा सुरू झाली़ त्यामुळे पोलिस पाटील ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी या घटनेची माहिती किल्लारी पोलिसांना दिली़ या माहितीवरून किल्लारी ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सिद्राम कोळी, सपोनि़ एस़ वाय़घुमारे यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पाहणी केली़ तेव्हा चोरट्यांनी तिजोरीसह रक्कम पळविल्याचे निदर्शनास आले़ दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल महाबोले यांनी भेट देऊन पाहणी केली़ लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे यांनीही बँकेची पाहणी केली़ याप्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल महाबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि डी़बी़ वाघमोडे करीत आहेत. 
श्वान पथक घुटमळले
चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. हे पथक रविवारी दुपारी १२ वाजता पोहोचले़ परंतू, शटरच्या भोवतालीच श्वान पथक फिरल्याने माग काढण्यात पोलिसांना यश आले नाही़.
तिजोरीतील रक्कम
बँकेच्या तिजोरीत हजार रुपयांच्या १६१, ५०० रुपयांच्या १००२, १०० रुपयांच्या १०४, ५० रुपयांच्या १० आणि १० रुपयांच्या ५ नोटा असल्याचे बँकेच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

Web Title: The bank was robbed of money by breaking the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.