गेल्या १० वर्षांत देशातील बँकींग व्यवस्था झाली कमकुवत : सुब्रह्मण्यम स्वामींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:19 PM2019-03-22T20:19:22+5:302019-03-22T20:27:30+5:30
पाश्चिमात्य देशांमध्ये आलेल्या मंदीतही भारताची अर्थव्यवस्था तग धरु शकली. मात्र, नियमांचे उल्लंघन आणि गैरमार्गाने दिलेली कर्जे यामुळे गेल्या १० वर्षांत बँकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे.
पुणे : भारतीय बँकिंग व्यवस्था अतिशय चांगली असून, पाश्चिमात्य देशांमध्ये आलेल्या मंदीतही भारताची अर्थव्यवस्था तग धरु शकली. मात्र, नियमांचे उल्लंघन आणि गैरमार्गाने दिलेली कर्जे यामुळे गेल्या १० वर्षांत बँकिंग व्यवस्था कमकुवत झाली आहे. सनदी लेखापालांना बँकेच्या व्यवहारांची माहिती असते. त्यामुळे वस्तुस्थिती लक्षात आणून देत लेखापालांनी बँकिंग व्यवस्थेला बळकट केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा खासदार आणि अर्थतज्ज्ञ सुब्रमण्यम स्वामी यांनी येथे केले.
दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारत विभागीय परिषद (डब्ल्यूआयआरसी), पुणे शाखा आणि पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘बँक ऑडिट कॉनक्लेव्ह’च्या उद्घाटनप्रसंगी स्वामी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बाणेर रस्त्यावरील यशदा येथे हा कार्यक्रम झाला. कॉसमॉस बँकेचे चेअरमन सीए मिलिंद काळे, ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य चंद्रशेखर चितळे, विभागीय सदस्य आनंद जाखोटिया, ‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षा ऋता चितळे, उपाध्यक्ष अभिषेक धामणे, 'आयसीएआय' पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष संतोष संचेती यावेळी उपस्थित होते.
सुब्रमण्यम स्वामी म्हणाले, ‘बँकांनी गेल्या काही वर्षात नियमबाह्य पद्धतीने नीरव मोदी, मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या यांच्यासारख्या लोकांना कर्जे दिली. राजकीय हस्तक्षेपाने ही मंडळी कर्जे बुडवून परदेशात पळाली. आयसीआयसीआय बँकेत पदाचा गैरवापर झाला. हे टाळण्यासाठी सनदी लेखापालांनी पुढाकार घ्यायला हवा. तरच आगामी काळात बँकिंग व्यवस्था आणखी सक्षम होईल.
काळे म्हणाले, बँकिंग क्षेत्रातील घोटाळे व्यवस्थेचे अपयश आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लेखापालांनी काम केले पाहिजे. लेखापाल हा नियंत्रकाच्या भूमिकेत असायला हवा. तसेच, केवळ क्रेडिट रिस्क (जमा जोखीम) आणि अनुत्पादित कर्जाचे वर्गीकरण एवढेच काम अपेक्षित नाही. बँकिंग व्यवस्थेचा पुरेसा अभ्यास असणेही गरजेचे आहे.
रिझर्व्ह बँकेच्या प्रसिध्दी पत्रकानुसार व्यावसायिक बँकांचे लेखापालन करताना अहवालात गंभीर त्रुटी किंवा अफरातफर आढळल्यास रिझर्व्ह बँकेच्या लेखापालाच्या यादीतून नाव कमी होऊ शकते. त्यामुळे लेखापालांनी योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे सीए चितळे यांनी सांगितले. संतोष संचेती यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. अभिषेक धामणे यांनी आभार मानले