कॅशलेस पेट्रोलमुळे बॅँकाच मालामाल

By Admin | Published: December 22, 2016 12:09 AM2016-12-22T00:09:31+5:302016-12-22T00:09:31+5:30

चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने असंख्य वाहनचालकांनी डेबिड, क्रेडिट कार्डचा वापर करून त्याद्वारे पेट्रोल भरण्यास सुरुवात केली.

Banknote for Cashless Petrol | कॅशलेस पेट्रोलमुळे बॅँकाच मालामाल

कॅशलेस पेट्रोलमुळे बॅँकाच मालामाल

googlenewsNext

विवेक भुसे/ ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 22 - नोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने असंख्य वाहनचालकांनी डेबिड, क्रेडिट कार्डचा वापर करून त्याद्वारे पेट्रोल भरण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने ९ डिसेंबर रोजी कार्डद्वारे पेट्रोल-डिझेल भरल्यास पाऊण टक्का सवलत देण्याची घोषणा केली. मात्र, ही सवलत तर दूरच, कार्डद्वारे पेट्रोल भरल्यास ग्राहकाला तब्बल ११़२४ रुपयांचा भुर्दंड पडत असून, ही रक्कम बँका सेवाकर म्हणून वसूल करीत आहेत. यामुळे पुण्यात दररोज कार्डद्वारे पेट्रोल-डिझेल घेणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३० लाख रुपयांचा भुर्दंड पडत आहे़ या सेवाकरामुळे बँका मालामाल झाल्या आहेत़

नोटाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला अनेकांनी ५०० रुपये देऊन पेट्रोल भरले; पण ज्यांच्याकडे पाचशेच्या नोटा नव्हत्या, ते कार्डचा वापर करू लागले़ पेट्रोल भरल्यानंतर कार्डचा वापर केल्यावर बँकांकडून ग्राहकांना तातडीने मेसेज पाठविला जातो़ त्यात जेवढ्या रकमेचे पेट्रोल भरले, तेवढी रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली असल्याचा मेसेज येतो़ त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना या रकमेवर बँका दामदुपटीने सेवाकर आकारत असल्याची माहितीच मिळत नाही़ नोटाबंदीपूर्वी केवळ २० टक्के ग्राहक कार्डचा वापर करून इंधन भरत होते़ आता हे प्रमाण ८० टक्क्यांवर पोहोचले आहे़ ग्राहक जेव्हा बँकेत जाऊन आपले पासबुक भरतो, तेव्हा त्याच्या लक्षात येते, की आपण २०० रुपयांचे पेट्रोल भरले असले, तरी प्रत्यक्षात बँकेने २११़२४ रुपये कापून घेतलेले आहे़ अशा प्रकारे पुणे शहरात दररोज हजारो ग्राहक कार्डचा वापर करून पेट्रोल-डिझेल भरत असून, त्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड बसत आहे़ याबाबत आॅल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले, की आज (बुधवारी) सकाळीच किमान १५ जणांचे आपल्याला फोन आले असून, त्यांनी कार्डद्वारे पेट्रोल भरले तरी सवलत मिळाली नाही; उलट सर्व्हिस चार्जच्या नावाखाली दुप्पट पैसे गेल्याचे सांगितले़ पुणे जिल्ह्यात ५५०, तर पुणे शहरात ३५० पेट्रोलपंप आहेत़ देशभरात ५२ हजार पेट्रोलपंप आहेत़ या पेट्रोलपंपांवर २ लाख लिटर पेट्रोलची विक्री होत असून, दररोज सरासरी १,००० ग्राहक पेट्रोलपंपावर इंधन भरतात़ पेट्रोलपंपचालकाला २०० रुपयांच्या पेट्रोलविक्रीवर ५़८० रुपये कमिशन मिळते़ शहरात प्रत्येक पेट्रोलपंपावर सरासरी १ हजार ग्राहक इंधन भरण्यासाठी येतात़ सध्या त्यातील ८० टक्के ग्राहक हे कार्डचा वापर करीत आहेत़

हे पाहता, पेट्रोलची साठवणूक, सुरक्षा, कामगार, पेट्रोलपंपाची देखभाल-दुरुस्ती हा सर्व खर्च सांभाळून पेट्रोलची विक्री करणाऱ्या पंपचालकाला जेवढे कमिशन मिळते त्याच्या दुप्पट रक्कम ई-व्यवहाराची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेला मिळत असल्याचे दिसून येते. तसेच हे सर्व्हिस चार्जचे दर प्रत्येक बँकेचे वेगळे आणि डेबिड व क्रेडिट कार्डसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते. पेट्रोल डीलर्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक पेट्रोलपंपावर सरासरी ८०० ग्राहक कार्डचा वापर करीत असतील, तर त्या प्रत्येकाकडून ११ रुपये घेतले जातात. पुण्यात ३५० पेट्रोल पंप आहेत़ याचा विचार केल्यास दररोज बँका सर्व्हिस चार्जच्या नावाखाली सुमारे ३० लाख रुपये ग्राहकांच्या खिशातून काढून घेत आहेत़

याबाबत नाव न सांगण्याच्या अटीवर एका बँक अधिकाऱ्याने सांगितले, की वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे दर आहेत़ बँकांना ०़५ ते ७ टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेण्याचा अधिकार आहे़ अनेक बँका विशेषत: खासगी बँका जास्तीत जास्त दर आकारतात़ बँका आपले स्वाइप मशीन देताना पंपचालकांबरोबर करार करतात़ त्यात हा दर किती असेल, हे नमूद केलेले असते़; पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही़ आमच्या बँकेचा दर हा ०़५ टक्के इतकाच आहे़; पण आमच्या बँकेच्या ग्राहकांनी ज्या पेट्रोलपंपावर आमचे मशीन आहे तिथे पेट्रोल भरले, तरच त्यांना आमचा दर पडतो़ पण, त्यांनी दुसऱ्या बँकेच्या मशीनद्वारे पेट्रोलचे पैसे अदा केले, तर ही अ‍ॅक्वायर बँक जास्तीत जास्त दर आकारते़ त्यामुळे ग्राहकांना हा भुर्दंड पडत आहे. 

 

ही तर लूट

पेट्रोलपंपचालकांना मिळणाऱ्या कमिशनपेक्षा सर्व्हिस चार्जच्या नावाखाली दुप्पट रक्कम घेणे ही तर ग्राहकांची लूट असून, हा प्रश्न आम्ही देशपातळीवर उठविणार आहोत़ केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हा सर्व्हिस चार्ज रद्द केला पाहिजे़ याबाबत अनेक ग्राहकांच्या तक्रारी आल्याने बँकेच्या मुख्यालयातून हा सर्व्हिस चार्ज कशा प्रकारे आकारला जातो, आपली बँक किती आकारते, प्रत्यक्ष ग्राहकांना इतका जास्त सर्व्हिस चार्ज का पडतो, हे ग्राहकांना समजावून सांगावे, असे पत्र आल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले़

Web Title: Banknote for Cashless Petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.