बँकांनी ऑनलाईन सात-बारा वापरणे बंधनकारक : मुख्य सचिव अजोय मेहता यांचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 10:30 PM2020-03-10T22:30:00+5:302020-03-10T22:30:02+5:30
सर्व शासकीय व कायदेशीर कामांसाठी ऑनलाईन सात-बारा ग्राह्य धरणार
पुणे : राज्यात आतापर्यंत तब्बल ८ लाखांपेक्षा जास्त डिजिटल स्वाक्षरित सात-बारा ऑनलाईन डाऊनलोड झाले आहेत. तसेच, ई हक्क प्रणालीत सुमारे साडेसात हजार ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून, त्यातील ४ हजार अर्ज निर्गत झाले आहेत. या प्रणालीचा वापर करून कोणत्याही बँकेला सात-बाऱ्यांवर बोजा दाखल करणे, तसेच कर्ज परतफेड केल्यानंतर सात-बाऱ्यांवरील बोजा कमी करण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. यामुळे यापुढे राज्यातील सर्व बँकांना आपल्या बँकिंगच्या अधिकृत कामांसाठी ऑनलाईन सात-बाऱ्यांचा वापर करावा, असे आदेश राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी दिले आहेत. तसेच, यापुढे सर्व कायदेशीर व शासकीय कामांसाठी ऑनलाईन सात-बारा ग्राह्य धरण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले.
राज्यातील सर्व बँकर्स समितीची बैठकी नुकतीच मुंबई येथे मेहता यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामुळे राज्यात सुरू असलेल्या सात-बारा संगणकीकरणाचे सादरीकरण ई-फेरफार या प्रकल्पाचे राज्य समन्वयक व उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी केले. याबाबत जगताप यांनी सांगितले, की राज्यात सुरू असलेल्या या प्रकल्पातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यभरातील तलाठी मंडळ अधिकारी व सर्व महसूल अधिकारी रात्रंदिवस काम करून संगणकीकृत सात-बाऱ्यांमधील त्रुटी दूर करण्याचे काम करीत आहेत. यामुळे सध्या तब्बल ९७ टक्के संगणकीकृत सात-बाऱ्यांमध्ये अचूकता आली आहे. तसेच तब्बल २ कोटी ५२ लाख सात-बाऱ्यांपैकी २ कोटी ४४ लाख सातबारे डिजिटल स्वाक्षरित केले आहेत. हे सर्व सात-बारे राज्यातील सामान्य जनतेला महाभूमीच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहेत.
आतापर्यंत राज्यातील सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक व महाराष्ट्र ग्रामीण बँक या पाच बँकांनी जमाबंदी आयुक्त यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा करारनामा प्रक्रियेत असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. मुख्य सचिव यांनी सर्व बँकांनी येत्या तीन महिन्यांत सामंजस्य करार करून ही सुविधा वापरावी, असे निर्देश दिले.